वैयक्तिक ते ऑफिसच्या कामापर्यंत अगदी सगळ्याच गोष्टींसाठी व्हॉट्सॲप हा अगदीच उपयोगी ॲप आहे. तसेच युजरच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या खास अनुभवासाठी व्हॉट्सॲप नेहमीच नवनवीन फीचर घेऊन येत असतो. अनोळखी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीचा तुमच्या फोनमध्ये नंबर सेव्ह नसेल, तर ती व्यक्ती किंवा युजर तुमचा प्रोफाइल फोटो, लास्ट सीन, स्टेटस अपडेट पाहू शकत नाही; हा अपडेट तर व्हॉट्सॲपमध्ये आधीपासूनच आहे. पण, जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीला (म्हणजेच – प्रोफाइल फोटो, लास्ट सीन, स्टेटस ) ‘एव्हरीवन’ (Everyone) ही प्रायव्हसी ठेवली असेल, तर मात्र कोणतीही व्यक्ती तुमचा प्रोफाइल फोटो व इतर माहिती सहज पाहू शकते. पण, आता व्हॉट्सॲप यासाठीसुद्धा एक खास फीचर घेऊन येणार आहे.
गेल्या काही महिन्यांत मेटा-मालकीचे व्हॉट्सॲपने चॅट लॉक, फोन नंबर शेअर न करता इतरांशी कनेक्ट होणे आदी अनेक अपडेट जारी केले. पण, आता WABetaInfo च्या अहवालात असे म्हटले आहे की, व्हॉट्सॲप लवकरच तुम्हाला इतर युजर्सच्या प्रोफाइल फोटोचे स्क्रीनशॉट घेण्यापासून बंदी घालणार आहे. युजर्सची प्रायव्हसी वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप या फीचरवर काम करत आहे. मेसेजिंग ॲप लवकरच वापरकर्त्यांना इतरांच्या प्रोफाइल फोटोचे स्क्रीनशॉट घेण्यापासून प्रतिबंध घालणार आहे.
आतापर्यंत व्हॉट्सॲपमध्ये अनोळखी व्यक्तींपासून प्रोफाइल फोटो लपविण्याचा (Hide ) पर्याय दिला होता. परंतु, इतर वापरकर्त्यांना तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेण्यापासून प्रतिबंध घालण्याचा कोणताही पर्याय नव्हता. पण, जसे अहवालात सांगण्यात आले आहे की, या नवीन फीचरच्या चाचणीनंतर वापरकर्त्यांसाठी हा सुद्धा पर्याय उपलब्ध होईल आणि कोणी तुमचा प्रोफाइल फोटो तुमच्या परवानगीशिवाय स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.
हे फीचर कसे काम करेल ?
या फीचरचे नाव ‘डिस्प्ले पिक्चर्स’ असे ठेवण्यात येईल. वैयक्तिक फोटो परवानगीशिवाय डाउनलोड करणे टाळणे, फोटो शेअरिंगला आळा घालणे आणि वापरकर्त्याची गोपनीयता वाढवणे आदी उद्दिष्टांसाठी हा फीचर लाँच करण्यात येईल. जेव्हा वापरकर्ते दुसऱ्याच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा एक सूचना (notification) सादर केली जाईल . ‘ॲप निर्बंधांमुळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही’ (Can’t take a screenshot due to app restrictions) असे यात तुम्हाला लिहिलेले दिसेल. हे फीचर आगामी आठवड्यात सर्व वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात येईल; असे या अहवालात सांगण्यात आले आहे.