काय ही आजकालची पिढी. सदानकदा मोबाइलला चिकटलेली. कानाला हेडफोन त्यामुळे काही सांगायची आणि त्यांच्या मेंदूपर्यंत पोहचण्याची सोय नाही. हात भराभर टेक्स्ट का काय म्हणतात ते करण्यात मशगूल. समोर माणसं दिसतच नाहीत त्यांना. फिजिकली अवतीभोवती असतात परंतु काही उपयोग नाही. आजीआजोबांच्या कट्टय़ावरचं हे ठाशीव स्वगत. तार-पत्र-लँडलाइनवरून ट्रंककॉल करणारे आजोबा कुठे आणि कामापासून सेल्फी क्लिक करून, ती जगाला शेअर करून, त्यावरच्या कमेंट्सवर चर्चा स्मार्टफोनच्या माध्यमातून करणारे नात-नातू अशी भलीमोठ्ठी कम्युनिकेशन गॅप टेक्नोसॅव्ही जगात उभी राहते. मेल पाठवणं, खरेदीविक्री करणं, गप्पा मारणं, शाब्दिक व्यक्त होणं या सगळ्यासाठी युवा पिढीला लाभलेला मित्र म्हणजे स्मार्टफोन. मात्र हे गिझ्मो आयुष्य पन्नाशीकडे झुकलेल्या आणि वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलेल्या पिढीला अचंबित करतं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातून, नोकरी व्यवसायातून मोकळ्या झालेल्या या पिढीला आधार हवा असतो. नॅनो कुटुंबांच्या संज्ञेत हा आधार आणखी अधोरेखित होतो. त्या वेळी मोबाइल फोन हा त्यांचा हक्काचा मित्र होऊ शकतो. मात्र ते फोनबिन आपल्याला नाही बुवा जमत या भावनेने या मित्राला दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. मात्र खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मोबाइल कंपन्यांनी सोपे, सुटसुटीत डिझाइन्सचे फोन लॉन्च केले आहेत.
टार्गेट ऑडियन्स हा मोबाइल फोनसंदर्भात कळीचा मुद्दा ठरतो. ज्येष्ठ नागरिक पिढीसाठी डिव्हाइस निर्मित्ती करताना काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. युवा पिढीसाठी हाय मेगापिक्सल कॅमेरा, अधिकाअधिक स्टोरेज कपॅसिटी, हायफंडू अ‍ॅप्लिकेशन्स, नेव्हिगेशन्स या गोष्टी आवश्यक असतात. मात्र यातल्या कशाची आजीआजोबांना गरज नसते. त्यांच्यासाठी हाताळायला सोपं आणि सुलभ आणि दिसायला ठसठशीत हे मुद्दे आग्रही ठरतात. वाढत्या वयानुसार हालचालीत शिथिलता येते. हाताला कंप सुटतो. दृश्यमानता कमी झालेली असते. त्यामुळे एरवी ‘डेलिकट डार्लिग’ असणारे फोन्स या पिढीसाठी उपयुक्त नाही. युवा पिढीसाठी टेक्स्ट करणं श्वास घेण्याइतकं सोपं आणि अ‍ॅटोमॅटिक प्रोसेस आहे. त्यामुळे स्मार्टफोनवरचा कीबोर्ड आणि त्यावरची अक्षरं कितीही किरटी असली तरी त्यांना फरक पडत नाही. बोटं एवढी सरावलेली असतात की गप्पा मारता मारता कोणाला तरी व्हॉट्स अप केलं जातं. तसं आजीआजोबांचं नाही. त्यामुळे एका बटनावर डझनावारी फंक्शन्स ऑपरेट होणारे फोन्स त्यांना गोंधळात टाकू शकतात. त्यादृष्टीने मोठय़ा आकाराची बटणं अनिवार्य ठरतात.
बहुतांशी आजी-आजोबा घरात एकटेच असतात. काहीची मुलं-मुली नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर असतात. काहींची देशाबाहेर असतात. तर काही वृद्धाश्रमात असतात. वाढत्या वयानुसार आजारपणांनी शरीराचा ताबा घेतलेला असतो. कोणत्याही क्षणी डॉक्टरला किंवा जवळच्या नातेवाईकाला कॉल करायला लागू शकतो. एकटय़ादुकटय़ा ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना लुटण्याचे प्रकारही घडत आहेत. अशा वेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फोन हा त्यांचा मित्र ठरू शकतो. यामुळेच खास या पिढीसाठी बनवण्यात आलेल्या फोन्समध्ये एसओएस हे बटन उपलब्ध असतं. ज्या व्यक्तीचा फोन आहे त्या व्यक्तीने तीन अतिमहत्त्वाचे नंबर्स सेट करायचे. आपात्कालीन परिस्थितीत एसओएस बटन प्रेस केल्यावर या तिघांना कॉल जातो. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्वरित मदत मिळू शकते. टेक्नॉलॉजीचा हा सकारात्मक उपयोग आजीआजोबांना नक्कीच सुखावू शकतो. मोबाइल म्हणजे लोढणं ही त्यांची भावना बाजूला पडून हे डिव्हाइस त्यांचा हक्काचा मित्र होऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांची पिढी हेही आपले ग्राहक असू शकतात हे स्मार्टफोन निर्मिणाऱ्या कंपन्यांच्या हळूहळू लक्षात येते आहे. त्यामुळे सध्या या पिढीसाठी बाजारात उपलब्ध फोन हे बेसिक फोन आहेत. कॉल करणं-कॉल घेणं, मेसेज करणं आणि येणं, रेडिओ या मूलभूत सुविधा प्राधान्याने या फोन्समध्ये आहेत. ही पिढीही स्मार्टफोन्स कॅरी करू शकतो हा विश्वास बाळगत मिताशी कंपनीने खास फोन लॉन्च केला आहे. बेसिक फोनशी मैत्री वाढल्यानंतर आजीआजोबा या मित्राकडे मैत्रीचा हात पुढे करू शकतात. या पिढीसाठी सध्या बाजारात उपलब्ध फोन्सचा घेतलेला हा धांडोळा.
फिलिप्स झेनियम एक्स २५६६
bll01टीव्ही, टेपरेकॉर्डर विश्वातलं दादा नाव असणाऱ्या कंपनीचा हा फोन केवळ ३८०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची बटनं आकाराने लहान आहेत मात्र त्यांच्यातलं अंतर जास्त असल्याने शब्द टाइप करताना चुका होण्याची शक्यता कमी. एसओएस बटनाची व्यवस्था या फोनमध्ये आहेत जी अडीअडचणीच्या वेळी कामी येऊ शकते. याव्यतिरिक्त काही उपयुक्त गोष्टी फिलिप्सने पुरवल्या आहेत. काही बटनांच्या आधारे स्क्रीनवरील अक्षरांचा साइज लहानमोठा होऊ शकतो. कॉम्प्युटरवर असणारी झूम इन-झूम आऊटसारखी ही सोय डोळ्यांना होणारा त्रास वाचवू शकते. एकदा चार्ज केल्यानंतर २४ तास फोन चालेल असा फिलिप्सचा दावा आहे. १,१२८ तासांचा स्टँडबाय टाइम देण्यात आल्याने फोन चार्ज करण्याचं आणि पर्यायाने कायम चार्जर कॅरी करण्याची कटकट ज्येष्ठ नागरिकांना नाही.
आयबॉल आसान २
नावातच गोष्टी सोप्या करून देणारा हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च झाला. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार डिव्हाइस निर्मित्तीचा पुढाकार घेणारी ही आद्य कंपनी. या फोनचं आधीचं व्हर्जन २०११ मध्ये बाजारात आलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने कंपनीने आणखी उपयुक्त गोष्टी अ‍ॅड करत नवीन मॉडेल बाजारात आणलं आहे. २,९९० रुपयांना हा फोन उपलब्ध आहे. मोठय़ा आकाराची बटनं आणि मोठय़ा टाइपातली अक्षरं ही चैन या फोनमध्ये आहे. एसओएस व्यवस्था अर्थातच आहे. गाण्यांची आवड असणाऱ्यांसाठी या फोनमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत डेटा स्टोरजची कपॅसिटीही वाढवण्यात आली आहे. अंधूक किंवा स्पष्ट दिसण्याची डोळ्यांची समस्या लक्षात घेऊन या फोनमध्ये चक्क एक टॉर्चचं बटन देण्यात आलं आहे. त्यामुळे एरवी फोन आणि हे बटन प्रेस केल्यावर बॅटरी म्हणून या डिव्हाइसचा वापर करता येऊ शकतो.
स्विंगटेल एसडब्ल्यू ५० प्लस
bll02१,०९९ इतक्या कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या फोनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सर्व सोयीसुविधा आहेत. बटनांचा आकार निश्चितच मोठा आहे मात्र अक्षरांचा साइज त्याअनुरूप मोठा नाही. त्यामुळे नंबर शोधताना किंवा आलेला मेसेज वाचताना त्रास होऊ शकतो. एसओएस बटन अर्थातच आहे.
मिताशी प्ले सीनिअर फ्रेंड
bll03याच आठवडय़ात लॉन्च झालेला हा ज्येष्ठांसाठीचा पहिलावहिला स्मार्टफोन आहे. यामध्ये अँड्राइड ४.४ प्रणाली आहे. टचस्क्रीन वापरणं आजीआजोबांसाठी थोडंसं गोंधळात टाकणारं होऊ शकतं हे ध्यानात घेऊन मिताशीने खास कस्टमाइज्इड इंटरफेस तयार केला आहे. होमस्क्रीनवर बॅटरीची क्षमता आणि नेटवर्कची उपलब्धता ठसठशीत आकारात दिसते. कॉल करण्यासाठी तसेच मेसेज करण्यासाठी-घेण्यासाठी मोठय़ा आकाराचे विविधरंगी आयकॉन्स पुरवण्यात आले आहेत. डय़ुअल सिमची व्यवस्था असलेल्या या फोनमध्ये १.२ गिगाहर्ट्झ डय़ुअल कोअर प्रोसेसर बसवण्यात आला आहे. ४ इंच डिस्प्ले असल्याने खिशात ठेवून वावरायला सोयीच्या अशा या फोनमध्ये ४ जीबी bll04इनबिल्ट स्टोरेज कपॅसिटी आहे. स्मार्टफोन असल्यामुळे बॅटरी पटापटा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे फोनसह चार्जरही बाळगण्याची तजवीज ज्येष्ठांना करावी लागू शकते.
याव्यतिरिक्त ब्लोटोन टी ६००, बीआयडी एम२९३ एन १, बिनाटोन बीबी २००, फोर्म लव वन, रिकनेक्ट १८०२, मॅजिकॉन सीनियर डय़ुओ हे फोन्स उपलब्ध आहेत. बाकी फोनसाठी मोबाइल कंपन्या अहमहमिकेने जाहिरात करताना दिसतात. मात्र या फोन्सच्या जाहिराती मर्यादित आहेत. वर उल्लेखलेले फोन्स सर्वसाधारण मोबाइलची विक्री करणाऱ्या दुकानात उपलब्ध आहेत तर काही केवळ इबे, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन साइट्सवर विक्रीसाठी आहेत. तंत्रज्ञानाला आपलंसं करत हक्काचा मित्र मिळवण्याची संधी या फोन्सनी ज्येष्ठांना करून दिली आहे.