तंत्रज्ञानातील प्रगतीने नाक्यावरचे सिनेमागृह घरात आणून ठेवले आहे, पण कितीही उत्कृष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असला तरी होम थिएटर यंत्रणा नसेल तर त्या टीव्हीवरून सिनेमा पाहण्याचा अनुभव प्रभावी ठरत नाही. मोबाइल, टॅब्लेट, कॉम्प्युटर किंवा पेन ड्राइव्हसारख्या उपकरणांनी परंपरागत म्युझिक सिस्टीमना फाटा दिला आहे, पण या माध्यमातून संगीत ऐकण्याचा आनंद अनुभवयाचा असेल तर त्याला चांगल्या स्पीकर्सची किंवा हेडफोन्सची जोड लागते. त्यामुळेच बाजारात स्पीकर्स किंवा होम थिएटर यंत्रणांची सध्या जोरदार धूम सुरू आहे. सर्वसामान्याला परवडतील अशा दरांपासून अतिशय महागडय़ा साऊंड सिस्टम्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याच वेळी ग्राहकाला केवळ आवाजापुरतेच खूश न करता आणखी काही सुविधा पुरवणारी वेगळी उत्पादने देण्याची स्पर्धाही कंपन्यांमध्ये लागली आहे. अलीकडच्या काळात अशीच काही उत्पादने बाजारात आली आहेत.

टचटोन ब्लूटूथ स्पीकर
आयडी अमेरिका या डिजिटर उत्पादनांतील कंपनीने टचटोन या नावाने ब्लूटूथ वायरलेस स्पीकर आणि स्पीकरफोन भारतात आणले आहेत. ब्लूटूथची यंत्रणा असलेल्या कोणत्याही गॅझेटशी हे स्पीकर्स कनेक्ट करून त्यावर गाणी वाजवता येतात. याशिवाय यावरून मुव्हीज, गेम्स किंवा फोनकॉल्सही शेअर करता येतात. सुमारे ३३ फुटांच्या परिघात हा वायरलेस स्पीकर काम करतो. यातील स्पीकरफोनमुळे कॉन्फरन्स कॉलिंग करणेही सोयीचे होते. या स्पीकर्सची मूळ किंमत ५५०० इतकी आहे, मात्र अ‍ॅमेझॉन, ईझोनऑनलाइन यांसारख्या कमर्शियल वेबसाइट्सवरून ते ४१९९ ते ४२६२ रुपयांत खरेदी करता येतील.

झेब्रॉनिक्सचे साऊंड मास्टर
झेब्रॉनिक्स या ब्रँड नावाखाली कॉम्प्युटर अ‍ॅक्सेसरीज आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बनवणाऱ्या इन्फोट्रॉनिक्सने आपल्या ५.१ चॅनेल स्पीकर्सच्या श्रेणीत आठ नवीन मॉडेल्स दाखल केले आहेत. ८० ते ११५ वॉट आरएमएस आवाजाची क्षमता असलेल्या या स्पीकर्समध्ये थेट एफएम रेडिओची सुविधा करून देण्यात आली आहे. याशिवाय यातील यूएसबी/एसडी स्लॉटमुळे मोबाइल, टॅब्लेट, पेन ड्राइव्ह जोडून गाणी ऐकण्याचा आनंद द्विगुणित करता येणार आहे. झेब-एसडब्ल्यू९३१० आरयूसीएफ ५.१ चॅनेलची ही स्पीकर सिस्टम दिसण्यासही आकर्षक आहे. या यंत्रणेतील सबवूफरला एफएम तसेच यूएसबी स्लॉट आहे, तर यासोबत मिळणारे पाच स्पीकर आपण हव्या त्या पद्धतीने घरात मांडू शकतो. या स्पीकरला ३.५ मिमीचा जॅक असल्याने कॉम्प्युटर, टीव्ही, डीव्हीडी, मोबाइल यांच्याशी तो थेट जोडता येतो. याशिवाय ही यंत्रणा हाताळण्यासाठी रिमोट कंट्रोलही पुरवण्यात आला आहे. या श्रेणीतील आठ मॉडेल्स झेब्रॉनिक्सने बाजारात आणले असून त्यांची किंमत ३७०० ते ४८०० रुपयांच्या घरात आहे. ही यंत्रणा झेब्रॉनिक्सच्या डीलर्सकडून किंवा  www.moneyvasool.com या वेबसाइटवरून ऑनलाइन ऑर्डर करून खरेदी करता येईल.

सोनीचे डीटीएच थिएटर
गाणी ऐकावी ती सोनीच्या सिस्टमवर असा जुना समज अजूनही या ब्रँडबाबत कायम आहे. आजवर अनेक दर्जेदार साऊंड सिस्टम आणि होम थिएटर पुरवणाऱ्या सोनीने डीटीएच थिएटरच्या माध्यमातून परंपरागत होम थिएटरचा आकार कमी करून त्याची मांडणी अधिक सहज केली आहे. आतापर्यंतच्या होम थिएटर्स सिस्टमच्या तुलनेत ४० टक्के कमी आकाराची ही यंत्रणा दिसायला मात्र चांगलीच स्टायलिश आहे. ५.१ चॅनेलच्या यंत्रणेची ध्वनिक्षमता एक हजार वॉट पीएमपीओ इतकी आहे. घरबसल्या सिनेमा पाहण्यासाठीचा हा आवाज सिनेमागृहाचा अनुभव देण्यासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा डीटीएचला जोडता येत असल्याने टीव्ही पाहण्याचा आनंद श्रवणीयही होतो. ही यंत्रणा एकाच वेळी टीव्ही आणि डीटीएचला जोडता येते. यासाठी एचडीएमआय कनेक्टिव्हिटी दिली गेली असल्याने आवाजाची सुस्पष्टता वाढते. याशिवाय या यंत्रणेसोबत एक ऑप्टिकल इनपुट आणि ऑडिओ-व्हिडीओसाठीही कनेक्टिव्हिटी पुरवण्यात आली आहे. यावरील एनएफसी टेक्नोलॉजीमुळे तुम्ही तुमच्या फोनवरील व्हिडीओ किंवा ऑडिओ ब्लूटूथवरून टीव्हीशी शेअर करू शकता. या स्पीकर्सना यूएसबी स्लॉटही पुरवण्यात आला आहे. या यंत्रणेची अंदाजित किंमत १९९९० रुपये आहे. ही किंमत जास्त वाटत असली तरी या स्पीकरचा दर्जा पाहिल्यास हा खर्च फारसा वाटणार नाही.

‘फेंडा’चे ४.१ स्पीकर्स
फेंडा ऑडिओ या कंपनीने ३६०० पीएमपीओ वॉट ध्वनिक्षमता असलेली ४.१ चॅनेल स्पीकर्स यंत्रणा बाजारात आणली आहे. या यंत्रणेत डिजिटल एफएम प्लेअरची सुविधा पुरवण्यात आली असून त्यावर १०० रेडिओ स्टेशन्स स्टोअर करता येतात. एक सबवूफर आणि चार सॅटेलाइट स्पीकर्स असलेल्या या यंत्रणेला यूएसबी आणि एसडी कार्ड स्लॉटही पुरवण्यात आला आहे. त्यामुळे थेट पेनड्राइव्ह किंवा मेमरी कार्डवरूनही गाणी या स्पीकर्सवर वाजवता येतील. यासोबत कंपनीने रिमोट कंट्रोलही दिला आहे. या यंत्रणेची किंमत ४९९० रुपये इतकी आहे.

एलजीची साऊंडप्लेट
स्पीकर्स म्हटले की चौकोनी खोके हे समीकरण आता मागे पडले आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार आता वेगवेगळ्या आकारांतील स्पीकर्स कंपन्या बाजारात आणत आहेत. त्यापैकी एलजीची ‘साऊंडप्लेट’ विलक्षण ध्वनिअनुभव देणारी आणि अतिशय कमी जागा व्यापणारी यंत्रणा आहे. ३४० वॉटच्या साऊंडप्लेटचा आकार एखाद्या डीव्हीडी प्लेअरसारखा आहे, मात्र यामुळे याच्या आवाजाच्या दर्जावर कोणताही परिणाम होत नाही. टीव्हीच्या खालील पोकळीतही सहज मावणाऱ्या सुमारे चार सेंटिमीटर उंचीच्या या साऊंडप्लेटचे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्याचा आकार आहे, मात्र यातून मिळणारा आवाज त्याहूनही परिणामकारक आहे. ४.१ चॅनेलच्या या साऊंडप्लेटमध्ये दोन सबवूफर आहेत. केवळ एका वायरनिशी टीव्हीशी कनेक्ट करता येणाऱ्या साऊंडप्लेटमध्ये ब्लूटुथ यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल, टॅब्लेटवरून थेट साऊंडप्लेटवर गाणी वाजवता येतात. या यंत्रणेची बाजारातील किंमत ३०९९० रुपये इतकी आहे.

क्रीएटिव्ह टी ४
एकीकडे होम थिएटर्सची रेलचेल असताना कॉम्प्युटरवरून ऑनलाइन मुव्हीज पाहण्याचे, गाणी ऐकण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे कॉम्प्युटरसाठीही चांगले स्पीकर्स आता बाजारात उपलब्ध होत आहेत. क्रीएटिव्ह या खूप आधीपासून कॉम्प्युटर्स स्पीकर्स बनवणाऱ्या कंपनीने टी ४ नावाचे २.१ चॅनेलचे स्पीकर्स बाजारात आणले आहेत, मात्र हे स्पीकर्स ५.१ चॅनेलच्या होम थिएटरलाही आव्हान देऊ शकतील इतके सक्षम आहेत. हे स्पीकर वायरलेस असल्याने कोठेही ठेवता येतात. यासोबत एक ऑडिओ पॉड पुरवण्यात आला आहे. या पॉडमधील एनएफसी यंत्रणेच्या साह्य़ाने ब्लूटूथच्या माध्यमातून फोन, टॅब्लेट कनेक्ट करून गाणी ऐकता येतात. मात्र, या स्पीकर्ससाठी तुम्हाला २९९९९ रुपये इतकी किंमत मोजावी लागेल.