चार तासांत सामान घरपोच

ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर सामान घरपोच येण्यासाठी किमान तीन ते चार दिवस वाट पाहावी लागते. मात्र किराणा माल अवघ्या काही तासांमध्ये आपल्या घरात पोहचण्याची व्यवस्था आस्कमीबाझार या ई-शॉपिंग संकेतस्थळाने केली आहे. यासाठी कंपीने १५ शहरांमधील विविध विभागांतील दुकानांशी संपर्क साधला असून त्यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरांचा समोवश करण्यात आला आहे. याचबरोबर कंपनीने फर्निचरसाठीही एका दिवसांत डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच कंपनीने तुम्ही ऑर्डर केलेले उत्पादन दुसऱ्या दिवशी घरपोच मिळावे यासाठी ‘नेक्स्ट डे डिलिव्हरी’चा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांना पाहिजे ती वस्तू तातडीने उपलबध होणार असून दुकानदारांनाही कमीत कमी पैशांमध्ये कमीत कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनीने  http://www.askmegrocery.com, mebelkart.com  हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. कंपनीने या सुविधांना हायपरलोकल असे नाव दिले आहे. आस्कमीच्या देशभरातील १४ मिलियन व्यवसायांशी सहकार्य करून हायपरलोकल सुविधा सुरू केल्याचे कंपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण मूर्ती यांनी स्पष्ट केले. तर किरणा विभगाची सुविध अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी नोव्हेंबर अखेपर्यंत ही संख्या २७ शहरांवर नेली जाणार आहे.

Untitled-14

स्मार्टफोन ते स्मार्ट क्लास

सध्या प्रत्येक कंपनी आपल्या फायद्याबरोबरच सामाजिक भान जपण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत असते. सॅमसंग इंडिया या कंपनीने देशातील ग्रामीण भागांतील शाळा तंत्रज्ञानानेयुक्त करण्याचे ठरविले आहे. स्मार्टफोन बनविणाऱ्या या कंपनीने २०१३मध्ये स्मार्टक्लास हा उपक्रम हाती घेतला आणि पहिल्या दोन वर्षांत देशभरातील २०० शाळांमध्ये स्मार्टक्लास उभारून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी हातभार लावला. यावर्षी असे ४०० वर्ग सुरू करण्याचा मानस कंपनीचे उपाध्यक्ष राजीव मिश्रा यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात वीजेची समस्या असेल तर त्या ठिकाणी कंपनीतर्फे यूपीएसही पुरविले जातात. याचबरोबर भविष्यात कंपनी सौरऊर्जेच्या मदतीने हे काम अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय आयटीआयशी सहकार्य करून तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते दुरुस्त करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले. कंपनीतर्फे महाराष्ट्रात अद्याप २० स्मार्ट वर्गखोल्या विकसित करण्यात आल्या असून कंपनीने ४०० शिक्षकांनाही प्रशिक्षित केले आहे. याचा फायदा आतापर्यंत १२००० विद्यार्थ्यांना झाला आहे.

मुंबईच्या कानाकोपऱ्यात नेटवर्क

मुंबईत कॉलड्रॉपची समस्या ही सर्वज्ञात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंपन्या पुढे सरसावल्या असून व्होडाफोनने नुकतेच मुंबईतील सुमारे १०० हून अधिक ठिकाणी आपले नेटवर्क अधिक चांगले करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात व्होडाफोनची रेंज मिळणे सोपे होणार आहे. याचबरोबर कंपनीने डिसेंबरअखेपर्यंत फोरजी बाजारात आणण्याचेही नुकतेच जाहीर केले आहे. दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धामुळे भविष्यात मुंबईकरांना चांगली नेटवर्क सुविधा मिळणे शक्य होणार आहे.

डेटा कॅशबॅक ऑफर

एअरटेल या कंपनीने फोरजीमध्ये याआधीच गुंतवणूक करून त्याच्या जाहिरातीही सुरू केल्या आहेत. याचबरोबर कंपनीने नुकतीच डेटा कॅशबॅक ऑफर बाजारात आणली आहे. यामध्ये रात्री १२ ते सकाळी ६ या वेळात तुम्ही जेवढा डेटा वापराल त्यातला ५० टक्के डेटा तुम्हाला सकाळी परत मिहणार आहे. म्हणजे या कालावधीत तुम्ही ५०० एमबी डेटा वापरला तर सकाळी तुम्हाला २५० एमबी डेटा परत मिळू शकणार आहे. यासाठी ग्राहकांना १२१ या क्रमांकावर <NIGHT>असा एमएमएस पाठवावा लागणार आहे.

– प्रतिनिधी