संकेतस्थळांवरील ‘एरर’चा संकेत

इंटरनेट सर्फिग या विषयावर आता नव्याने शिकवणी घेण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर इतका अमर्याद झाला आहे की, सर्फिग करता करताच आपण याबद्दलच्या अनेक गोष्टी आत्मसात करत असतो.

इंटरनेट सर्फिग या विषयावर आता नव्याने शिकवणी घेण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर इतका अमर्याद झाला आहे की, सर्फिग करता करताच आपण याबद्दलच्या अनेक गोष्टी आत्मसात करत असतो. पण ब्राउजिंग व्यवस्थित सुरू असेपर्यंत हे सगळं साथ देत असतं. एखाद्या वेळी अचानक काही ना काही कारणाने आपण भेट दिलेल्या संकेतस्थळावर ‘एरर’ येते आणि आता पुढे काय, असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. अशा वेळी आपलं नेट कनेक्श डाउन आहे, संबंधित वेबसाइट बंद आहे की आणखी काय, असे अनेक प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. बऱ्याचदा आपलं इंटरनेट कनेक्शन बंद आहे, या शक्यतेवर येऊन आपला शोध थांबतो. पण प्रत्येक वेळी इंटरनेट कनेक्शन हाच वेब ब्राउजिंगचा अडथळा असतो, असे नाही. वेबसाइट पाहताना येणाऱ्या प्रत्येक ‘एरर’ अथवा गफलतीचे संकेत वेगवेगळे आहेत. त्याबद्दलच माहिती देण्याचा हा प्रयत्न..

22सर्टिफिकेट एरर – वेब ब्राउजिंग करताना बऱ्याचदा येणारी ही अडचण वापरकर्त्यांला बुचकळय़ात पाडते. पण खरे तर याला अडचणीपेक्षा सावधानतेचा इशारा असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ‘एचटीटीपीएस’ च्या माध्यमातून एखादी वेबसाइट ओपन करताना ही अडचण येते. प्रत्येक वेबसाइटला एक सुरक्षा प्रमाणपत्र दिलेले असते. त्याला ‘एसएसएल सर्टिफिकेट’ असं म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादी वेबसाइट सुरू करत असता, तेव्हा ती वेबसाइट उघडण्यापूर्वी हे ‘एसएसएल सर्टिफिकेट’ तपासून ती वेबसाइट कायदेशीर अथवा प्रमाणित आहे का, याची खातरजमा केली जाते. उ.दा. गुगल डॉट कॉम या संकेतस्थळाला जेव्हा तुम्ही भेट देता, तेव्हा या संकेतस्थळावरील प्रमाणपत्राची पडताळणी करून खुली होणारी वेबसाइट नेमकी गुगलच आहे का, याची खात्री केली जाते. म्हणजे, गुगलच्या आडून वेगळेच संकेतस्थळ तर खुले होत नाही ना, हे तुमचे ब्राउजर तपासून पाहते. त्यामुळे चुकून अथवा फसवणुकीने तुम्ही दुसऱ्या संकेतस्थळाशी कनेक्ट होण्याचा धोका टळतो.
पण प्रत्येक वेळी तुम्हाला ‘एसएसएल सर्टिफिकेट’ एरर दिसली तर त्याचा अर्थ संबंधित संकेतस्थळ चुकीचे वा अप्रमाणित आहे, असा होत नाही. नेटबँकिंग अथवा बँकांशी संबंधित संकेतस्थळ ओपन करतानाही अशा प्रकारची ‘एरर’ दिसू शकते. याचे कारण त्यावेळी तुमचे इंटरनेट कनेक्शन ‘सेक्युअर’ म्हणजेच सुरक्षित नसते. अन्य लोकही वापर करत असलेल्या ‘वायफाय’च्या माध्यमातून अशा वेबसाइट ओपन करताना ही अडचण येते. कारण, तुम्ही त्या संकेतस्थळावर देणार असलेली माहिती अतिशय गोपनीय असल्याने ती चोरली जाऊ नये, या हेतूने इंटरनेट ही सावधगिरी घेतो.
याखेरीज एखाद्या संकेतस्थळाने आपल्या सर्टिफिकेटचे नूतनीकरण केलेले नसेल किंवा त्याची नोंदणी केली नसेल तरी अशी ‘सर्टिफिकेट एरर’ दिसू शकते. याशिवाय तुमच्या कॉम्प्युटरवरील दिनांक आणि वेळ आधीची असेल तरी अशी ‘एरर’ दिसू शकते. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला अशी ‘एरर’ दिसेल तेव्हा सर्वप्रथम तुमच्या संगणकाची वेळ आणि दिनांक तपासून पाहा. ती योग्य असेल आणि तरीही अडचण येत असेल तर शक्यतो संबंधित संकेतस्थळाला भेट देणे टाळा.

23फिशिंग किंवा मॅलवेअरचा इशारा – तुम्ही क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्स्प्लोरर किंवा अन्य कोणत्याही ब्राउजरच्या मदतीने इंटरनेट सर्फिग करत असाल तरी अशी ‘एरर’ तुम्हाला पाहायला मिळेल. याचे कारण संबंधित संकेतस्थळामध्ये धोकादायक ‘मॅलवेअर’ अथवा ‘व्हायरस’ असण्याचा धोका असतो. आपण जेव्हा ब्राउजिंग करत असतो, तेव्हा आपल्या नकळत आपला ब्राउजर अशा धोकादायक संकेतस्थळांची संभाव्य यादी तयार करत असते. बऱ्याचदा खऱ्या वेबसाइटच्या आडून अन्य काही वेबसाइट्स तुमच्या ब्राउजरमध्ये मॅलवेअर सोडण्याच्या तयारीत असतात. असे मॅलवेअर संगणकातील सर्व माहिती चोरून आपल्या सव्‍‌र्हरकडे पोहोचवण्याचे काम करत असतात. त्यामुळे अशा संकेतस्थळांचा वापर नक्कीच टाळला पाहिजे.
बऱ्याचदा आपण नियमितपणे हाताळणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळांच्या बाबतीततही असा इशारा दिला जातो. मात्र, संबंधित संकेतस्थळ माहितीचे असल्याने आपण ब्राउजरला पुढे जाण्याचा अर्थात ‘कन्टीन्यू ब्राउजिंग’ करण्याची आज्ञा देतो. परंतु, अशा वेबसाइट ‘हॅक’ झालेल्या अथवा त्यात ‘व्हायरस’चा शिरकाव झालेल्या असू शकतात. त्यामुळे याबाबतीतही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

25४०४ नॉट फाउंड – वेब ब्राउजिंग करताना सर्वात अधिकदा दिसणारी ही ‘एरर’ आहे. तुम्ही ज्या वेबसाइटचा अ‍ॅड्रेस टाइप केला आहे. ती वेबसाइट अस्तित्वात नसल्याने अथवा बंद करण्यात आल्याने अशी ‘एरर’ दिसते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही टाइप केलेल्या अ‍ॅड्रेसचे ‘स्पेलिंग’ बरोबर आहे का, याची खातरजमा करून घ्या. ‘४०४ नॉट फाउंड’ ही सामायिक गफलत असली तरी अनेक वेबसाइट आपल्या पद्धतीने किंवा वेगवेगळय़ा डिझाइनमध्ये ही ‘एरर’ दाखवत असतात.

सव्‍‌र्हर नॉट फाउंड – ही ‘एरर’देखील अतिशय कॉमन आहे. तुम्ही वेबसाइटचा अ‍ॅड्रेस चुकीचा टाइप केला असेल तर ही ‘एरर’ दिसू शकते. शिवाय तुमच्या इंटरनेटचा ‘डीएनएस सव्‍‌र्हर’ डाउन असेल किंवा त्याचे सेटिंग्ज चुकले असतील, तरी हे ‘पेज’ दिसू शकते.

अनेबल टू कनेक्ट – एखाद्या वेबसाइटचा स्वत:चा सव्‍‌र्हर डाउन असेल अथवा त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या असतील तर, अशा पद्धतीचा ‘एरर मेसेज’ आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळी तुमचे ‘डीएनएस सव्‍‌र्हर’ किंवा इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित काम करत असते, हे लक्षात ठेवा. मात्र, तुमच्या संगणकाची ‘फायरवॉल’ किंवा ‘प्रॉक्सी’ यांनी रोखल्यामुळेही हा दोष निर्माण होऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Meaning of different errors on websites

ताज्या बातम्या