भारतात सध्या ‘मेक इन इंडिया’चे वारे वाहत आहेत. या सर्वात आयटी उद्योगातील कंपन्या आघाडीवर आहेत. अनेक तरुणही यात पुढाकार घेत आहेत. यातही मोबाइल अ‍ॅप विकासकांची संख्या खूपच जास्त आहे. यामुळे या क्षेत्रात तगडी स्पर्धा निर्माण होत आहे. म्हणूनच उद्योग सुरू करताना नेमका काय विचार करायचा. याचबरोबर भविष्यात अ‍ॅप उद्योग यशस्वी करण्यासाठी काय करायचे याबाबत ‘शेअर इट’ या अ‍ॅप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यान फेई यांनी लिहिलेला लेख.

आज संपूर्ण जग मोबाइलच्या कवेत गेले आहे. जगभरात अ‍ॅपच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषत: भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत. ‘ईमार्केटर’ने बांधलेल्या अंदाजानुसार २०१६ मध्ये जगभरातल्या २०० कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्मार्टफोन येतील ज्यातले २० कोटी स्मार्टफोन भारतात असतील. आजघडीला ‘फॅब्लेट’ हे जगभरातलं सर्वाधिक खपाचं मोबाइल उपकरण आहे, ही गोष्ट लक्ष वेधून घेणारी आहे. भारतातील फॅब्लेट वापरणाऱ्यांच्या आकडेवारीत अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. ‘फ्लरी’ने केलेल्या निरीक्षणातून असं आढळलं आहे की भारतातले ३८ टक्के यूजर्स हे फॅब्लेटवर आहे तर हेच प्रमाण अमेरिकेत २१ टक्के आहे.

स्मार्टफोनमुळे भारतात इंटरनेटचा वापर तळागाळात पोहचला आहे. यामुळे मोफत आणि पैसे आकारून विकत घेणाऱ्या अ‍ॅप्सच्या बाजारात भारत हा एक मापदंडच बनला आहे. ‘याहू’च्या एका अहवालानुसार, भारतातला मोबाइल अ‍ॅपचा वापर १३१ टक्क्यांनी वाढला आहे तर आशियातली अ‍ॅपची बाजारपेठ ७७ टक्क्यांनी वाढली आहे. अ‍ॅप्सच्या प्रगतीसाठी उदयोन्मुख बाजारपेठांमधलं वातावरण पोषक असल्याने अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय अ‍ॅप कंपन्या या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी जागतिक बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. मात्र अ‍ॅप्सच्या या स्पर्धात्मक बाजारात यशस्वी होताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.

विश्लेषण आणि र्सवकष संशोधन

सर्वात महत्त्वाचं आणि प्राथमिक पाऊल म्हणजे वेगवेगळ्या परदेशी बाजारपेठांचं विश्लेषण करणं. याचबरोबर भौगोलिक स्थिती आणि झपाटय़ाने होणारी वाढ या कसोटय़ांवर बाजारपेठांची निवड करणे. त्यानंतरच पुढला टप्पा आखणं गरजेचं आहे. त्यात बाजारपेठेतले बदल, ट्रेण्डस यांचा अंदाज बांधून त्याप्रमाणे पुढल्या कृती कराव्यात. नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करताना हे नियोजन त्या अ‍ॅपच्या यशाला किंवा अपयशाला कारणीभूत ठरू शकतं. उदयोन्मुख बाजारपेठांमधली स्पर्धा सातत्याने तीव्र होत असल्याने, प्रत्येक उपविभाग हे एकाच वेळी अनेक कंपन्यांनी व्यापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा देशांमध्ये अ‍ॅपला आपल्या प्रयत्नांमध्ये वृद्धी करावी लागेल आणि अल्पावधीत जगभरातल्या जास्तीत जास्त यूजर्सची मनं जिंकता आली पाहिजेत. चांगल्या उत्पादनांची निर्मिती आणि मूळ क्षमता वाढवण्यावर भर देत असतानाच कंपन्यांना अत्यंत तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर स्रोतांची निर्मिती करून ठेवणे.

प्रत्येक बाजारपेठेसाठी स्थानिकीकरण

आपलं अ‍ॅप जागतिक स्तरावर पोहोचवणं ही केवळ ‘झाल्यास उत्तम’ अशी योजना राहिली नसून ती अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. तरीही जागतिक बाजारपेठेत प्रवेश करताना, प्रत्येक बाजारपेठेची स्थानिक संस्कृती आणि भाषेची वैशिष्टय़ जाणून घेऊन त्याप्रमाणे अ‍ॅपची निर्मिती केली पाहिजे. त्यामुळे ब्रॅण्ड प्रमोशन आणि वापरकर्त्यांचा अनुभव यांचे स्थानिकीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कोअर व्हॅल्यू प्रोपोझिशन राखणं:

अ‍ॅपचं स्थानिकीकरण करताना उत्पादनाची काही वैशिष्टय़ बदलणं किंवा त्यात फेरफार होणं स्वाभाविक आहे, जेणेकरून ते त्या बाजारपेठेला साजेसं होईल. काही वेळा तो बदल करणं अपरिहार्य असेल तरी ते करत असताना त्या अ‍ॅपची मूळतत्त्वं, संकल्पना तसंच फॉर्मेटला धक्का लागता कामा नये. ही समानता सर्वच बाजारपेठांमध्ये कायम राखता आली पाहिजे. अ‍ॅपची मूळ संकल्पनाच त्या ब्रॅण्डला अ‍ॅप बाजारपेठेतल्या स्पर्धेत इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करू शकेल.

वापरकर्त्यांला गुंतवून ठेवणे

वापरकर्त्यांने आपलं अ‍ॅप अनइन्स्टॉल करू नये यासाठी अ‍ॅपचं अस्तित्व सर्वच सोशल मीडिया व्यासपीठांवर ठळकपणे जाणवलं पाहिजे. दररोज वापरकर्त्यांशी संवाद साधणं, त्यांच्या आवडीनिवडींबाबत माहिती शोधून काढणं आणि त्यांची डिजिटल वर्तवणूक मोजत राहणं यातून कंपनीला आपल्या ग्राहकांबद्दल मौल्यवान माहिती आणि दृष्टी मिळू शकते. वापरकर्त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधणं आणि राखून ठेवणं, यामुळे एक गोष्ट घडू शकते. तुमचं अ‍ॅप यूजर्सच्या अनइन्स्टॉल्ड बिनमध्ये दिसणार नाही.

ग्राहकांनाच बनवा आपले ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

नव्या बाजारपेठेत आपली प्रतिमा बनवण्यासाठी ग्राहकांना आलेला चांगला अनुभव निर्णायक ठरू शकतो. उत्पादनाचं प्रमोशन ग्राहकांमार्फत ग्राहकांकडे जितकं होईल तितकं चांगलं. उत्पादनात सातत्याने चांगले बदल घडवून आणल्याने ते अ‍ॅप वापरकर्तेही प्रोडक्ट डिझाइनच्या माध्यमातून ग्राहकांचा अनुभव अधिकाधिक समृद्ध बनवतं. या नव्याने घडवण्यात आलेल्या अतिरिक्त वैशिष्टय़ांमुळेच यूजर्सच्या संख्येबरोबर डाऊनलोड्सची संख्याही झपाटय़ाने वाढते. यूजर्स ते वापरत असलेल्या चांगल्या अ‍ॅपची शिफारस आपल्या मित्रांकडे करतात. अशा प्रकारे ग्राहकच तुमचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनतील.