प्रसिध्द सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुकने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी फ्री पब्लिक वायफाय शोधण्याची नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या ही सुविधा फेसबुक iOS अॅपवर सुरू करण्यात आली आहे. फेसबुक iOS अॅप स्वतःहून परिसरातील जवळचे मोफत वायफाय शोधून त्याची यादी अॅपवर झळकवेल. या नवीन सुविधेस ‘फाइंड वाय-फाय’ असे नाव देण्यात आले आहे. फेसबुक iOS अॅपच्या सेटिंग्जमध्ये ही सुविधा सापडेल. या सुविधेच्या वापरासाठी तुमच्या स्मार्टफोनचे लोकेशन सतत ऑन ठेवावे लागेल.

Find Wi-Fi फोनमधील लोकेशन हिस्ट्री जमा करते. याच्यामार्फत फेसबुक काही निवडक स्थळांची हिस्ट्री तयार करते. अॅक्टिव्हिटी लॉगमध्ये जाऊन ही हिस्ट्री पाहण्याची अथवा डिलिट करण्याची सोय आहे. फ्री अथवा पब्लिक वायफाय उपलब्ध करून देणारी कंपनी, मॉल अथवा कॅफेसारख्या जागांची यादी यात असेल. तुम्ही पब्लिक वायफायच्या रेंजमध्ये नसताना या यादीतील कोणत्याही जागेवर क्लिक केल्यास ओपन पेज आणि गेट डायरेक्शन असे पर्याय तुमच्यासमोर योतील. ओपन पेज वर क्लिक केल्यास ती कंपनी, मॉल अथवा कॅफेचे प्रोफाइल फोनच्या स्क्रिनवर अवतरेल. यात इच्छित स्थळ उघडण्याची आणि बंद होण्याच्या वेळसह अन्य माहिती दिलेली असेल.
फेसबुक काही निवडक देशांमध्येच या सुविधेची चाचणी करणार असल्याचे वृत्त सुरुवातीला आले होते. असे असले तरी भारतातील आयफोन युजर्ससाठीदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसते. या सुविधेमार्फत फेसबुकने सतत डेटा पॅक अथवा इंटरनेटशी न जोडलेल्या युजर्सवर लक्षकेंद्रित केले आहे. यामुळे युजर्स सतत फेसबुकशी जोडलेले राहतील. खासकरून युजर घरापासून दूर असतानादेखील फेसबुकचा वापर करेल.