साधारण पाच वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर जिओनीने स्मार्टफोन ग्राहकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. २०१४मध्ये आणलेला ‘एस५.१’ असो की अलीकडेच बाजारात दाखल झालेला ‘ए१’ असो जिओनीच्या स्मार्टफोननी ग्राहकांना नवीन काही तरी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु या कंपनीचा गेल्या आठवडय़ात बाजारात आलेला ‘ए१ प्लस’ हा फोन ग्राहकाला मोजलेल्या किमतीचे मोल देण्यात अपयशी ठरतो.

जिओनीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेचा सहा टक्के हिस्सा आपल्या ताब्यात ठेवला आहे. पाच वर्षांपूर्वी देशात प्रवेश करणाऱ्या कंपनीच्या मानाने हा हिस्सा लक्षणीय नसला तरी कंपनीने वैविध्यपूर्ण आणि ग्राहकाला अधिकाधिक सुविधा देणारे स्मार्टफोन आणत भारतात स्वत:चा एक चाहतावर्ग तयार केला. याच चाहत्यांच्या लाटेवर स्वार होत जिओनीचे स्मार्टफोन देशातील एक कोटीहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचले. आणि याच लाटेवर स्वार होत कंपनीने नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणले. गेल्या आठवडय़ात आणलेला ‘जिओनी ए वन प्लस’ हा याच श्रेणीतील स्मार्टफोन. मोठय़ा आकाराचा आणि बहुतांश सुविधा असलेला हा फोन ग्राहकांना आकर्षित करणारा आहे, परंतु जिओनीचा आजवरचा वकूब पाहता या फोनमध्ये नवीन काही हाती मिळण्याची ग्राहकांची अपेक्षा मात्र ‘जिओनी ए वन प्लस’ पूर्ण करू शकत नाही.

जिओनी ‘ए वन प्लस’ अशा वेळी बाजारात येत आहे, जेव्हा ‘ए वन’ हा जिओनीचा स्मार्टफोन ग्राहकांना आकर्षित करत आहे. डय़ुअल रिअल कॅमेरा, फास्ट चार्जिग, सहा इंची स्क्रीन, मोठा आकार, मोठी बॅटरी, दोन वर्षांची वॉरंटी अशी वैशिष्टय़े मोजली तर ‘एवन प्लस’ हादेखील ग्राहकांना आकर्षित करू शकतो. परंतु त्यासाठी मोजावी लागणारी किंमत आणि प्रत्यक्ष स्मार्टफोन हाताळणी यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘आपण जास्त पैसे मोजले’ अशी भावना निर्माण झाल्यावाचून राहात नाही.

डिझाइन व हार्डवेअर

‘ए वन प्लस’ची सर्वात मोठी उणिवेची बाजू या फोनची डिझाइन अर्थात रचना आहे. सहा इंची स्क्रीन असल्यामुळे सहाजिकच हा फोन आकाराने मोठा झाला आहे. पण मोठा होताना त्यातील आकर्षकपणा काहीसा हरवला गेला आहे. मेटल डिझाइन आणि कव्‍‌र्हड ग्लास यामुळे स्मार्टफोन दिसायला व्यवस्थित वाटतो, पण तो हाताळायला आरामदायक नाही. मोठय़ा आकाराचा स्मार्टफोन असल्यामुळे ‘ऑन द गो’ मनोरंजनासाठी हा स्मार्टफोन उपयुक्त आहे. त्यानुसार रंगसंगती व्यवस्थित आहे. विविध कोनांतूनही स्क्रीनवरील दृश्याच्या स्पष्टतेत कमतरता जाणवत नाही.

हा फोन चार जीबी रॅमवर चालणारा असून २.५ गिगाहार्ट्झ क्षमतेचा ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर त्याला कार्यान्वित ठेवतो. या फोनची अंतर्गत स्टोअरेज क्षमता ६४ जीबी इतकी असून तो २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. मात्र यासाठी तुम्हाला डय़ुअल सिम स्लॉटचा एक भाग वापरावा लागतो. त्यामुळे मेमरी वाढवायची तर तुम्हाला एका सिमवर पाणी सोडावे लागू शकते. अलीकडच्या काळातील सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या ‘कनेक्टिव्हिटी’च्या सुविधा ‘ए वन प्लस’मध्येही उपलब्ध आहेत. या फोनला दोन स्पीकर असून त्यातील एक पुढील बाजूस व एक मागील बाजूस आहे. त्यामुळे या स्मार्टफोनवरून मूव्हीज पाहण्याचा किंवा गाणी ऐकण्याचा अनुभव चांगला आहे.

‘ए वन प्लस’मध्ये जलद फिंगरप्रिंट सेन्सर आहे ज्यामुळे फोन फक्त ०.२ सेंकदात अनलॉक होतो. भारतीय दमट वातावरणाचा विचार करून ओलसर बोट लावूनदेखील ‘फिंगर पिंट्र स्कॅनर’ व्यवस्थितपणे काम करतो. याशिवाय ‘फिंगर प्रिंट सेन्सर’मुळे ‘एजबार’ सुरू होतो व वापरकर्ता एक क्लिकवर आपल्याला हवा तो अ‍ॅप सुरू करू शकतो.

बॅटरी

या स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ त्याची बॅटरी आहे. ‘ए वन प्लस’मध्ये ४५५० एमएएच ताकदीची बॅटरी पुरवण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवस वेब ब्राऊजिंग व अन्य सुविधा वापरूनही बॅटरी व्यवस्थित काम करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे, कंपनीने यासोबत ‘फास्ट चार्जर’ पुरवला असून त्याद्वारे मोबाइल लवकर चार्ज होतो.

ऑपरेटिंग सिस्टिम

‘जिओनी ए वन प्लस’ अँड्रॉइड नगेट ७.० या कार्यप्रणालीवर कार्यान्वित असून त्याला जिओनीच्या स्वत:च्या ‘अमिगो यूजर इंटरफेस’ची जोड मिळाली आहे. या ‘इंटरफेस’मुळे वापरकर्त्यांना हजारो थिम्स व वॉलपेपर हाताळायला व फोनसाठी निवडायला मिळतात.

वरील सर्व वैशिष्टय़े पाहिल्यानंतर ‘जिओनी ए वन प्लस’ आकर्षक फोन वाटतो, पण २६९९९ रुपये किंमत आणि ही वैशिष्टय़े यांची तुलना करता, ग्राहकांची निराशा होण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे, फोन हाताळताना आपण काहीतरी नवीन हाताळतोय, असे जाणवत नाही. नावीन्याचा हा अभाव ‘यूजर इंटरफेस’पासून ‘डिझाइन’पर्यंत प्रत्येक बाबतीत दिसून येतो.

अर्थात, हा फोन अनेक बाबतीत उजवाही ठरतो. फोनच्या कॅमेऱ्याची कामगिरी दर्जेदार आहे. याशिवाय बॅटरीही कंपनीच्या दाव्याप्रमाणे दोन दिवसांपर्यंत टिकून राहते. मोठय़ा स्क्रीनमुळे या फोनवरून चित्रपट पाहण्याचा अनुभव चांगला आहे. पण या सर्व गोष्टी थोडय़ा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्येही मिळू शकतात, हेही तितकेच खरे!

कॅमेरा

या फोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. यात एक १३ मेगापिक्सेलचा, तर दुसरा ५ मेगापिक्सेलचा आहे. उलट पुढील बाजूस २० मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. सध्या सेल्फीला तरुणवर्गातून जास्त महत्त्व दिले जात असल्याने अनेक मोबाइल कंपन्या फ्रंट कॅमेरा जास्त क्षमतेचा पुरवण्यावर भर देतात. तो कल ‘ए वन प्लस’मध्येही दिसून येतो. डय़ुएल रेअर कॅमेरावर सूक्ष्म बारकावेही टिपता येतात. अंधूक प्रकाशातही हा कॅमेरा व्यवस्थित फोटो टिपतो. जिओनीच्या स्वतंत्र ‘फेशियल एन्हान्समेंट अल्गोरिदम’मुळे फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांचा चेहरा आपोआप शोधतो आणि ‘कस्टम ब्युटी सेटिंग्ज’च्या साह्याने छायाचित्र अधिक उजळ व आकर्षक बनवतो.

आसिफ बागवान – asifbagwan@expressindia.com