* मला सर्व सरकारी संकेतस्थळांची माहिती कोठे उपलब्ध होऊ शकेल याबाबत माहिती हवी आहे.     

देवेंद्र चव्हाण, पेण

  • देशात ई-गव्‍‌र्हनन्साचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्वच सरकारी विभागांची संकेतस्थळं उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारच्यां संकेतस्थळांचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे तिकिटापासून इतर अनेक सेवा पुरविण्यासाठीही संकेत स्थेळे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व संकेतस्थळांची लिंक तुम्हाला एकत्रित हवी असेल तर http://goidirectory.nic.in/index.php या संकेतस्थळाला भेट द्या. यावर तुम्हाला केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारांच्या विविध विभागांत सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय देशातील विविध न्यायालयांची माहितीही या संकेतस्थळावर तुम्हाला मिळू शकेल. राज्यनिहाय किंवा विभागनिहाय विभागणी केल्यामुळे पाहिजे ते संकेतस्थळ शोधणेही सोपे होणार आहे.

 

* माझ्या मेमरी कार्डमधून डीसीआयएम फोल्डरमधील सर्व फोटो डिलिट झाले तरी बॅकअप कसा घ्यावा.

संजय शेटकर, भांडुप

  • अनेकदा हे फोटो तुमच्या मेमरीकार्डच्या तात्पुरत्या साठवणुकीत मिळू शकतात. यामुळे तुम्ही सर्वप्रथम एक नवीन फोटो काढून बघा. कदाचित नवीन डीसीआयएम फोल्डर तयार होईल आणि त्यात तुम्हाला कदाचित जुने फोटो मिळू शकतील. तसे नाही झाले तर एसडी कार्ड रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्या माध्यमातून तुम्हाला फोटो मिळवता येऊ शकतील. यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड केलेल्या संगणकातील कार्ड रीडरमध्ये कार्ड टाकून सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही कार्डातील फोटो मिळवू शकता.

या सदरासाठी प्रश्न  kstechit@gmail.com वर मेल करा.