News Flash

फोनची ‘स्पेस’ वाढवा!

स्मार्टफोन आणि टॅब्लेट कितीही जास्त स्टोअरेज क्षमतेचे असले तरी, कालांतराने ती जागा अपुरी पडू लागते.

फोन वा टॅब्लेटची ‘स्पेस’ हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. नानाविध अ‍ॅप्स, गाणी, व्हिडीओज, सिनेमे, छायाचित्रे यामुळे एका क्षणानंतर फोनची स्टोअरेज क्षमता अचानक कमी भासू लागते. मोबाइलची स्टोअरेज क्षमता वाढवणे आपल्या हातात नाही. मात्र, त्याचे योग्य नियोजन करून आपण आपल्या फोनची ‘स्पेस’ बऱ्यापैकी वाढवू शकतो.

स्मार्टफोन आणि टॅब्लेट कितीही जास्त स्टोअरेज क्षमतेचे असले तरी, कालांतराने ती जागा अपुरी पडू लागते. आपण फोन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर शेकडो अ‍ॅप्स इन्स्टॉल करतो, अनइन्स्टॉल करतो. हजारो फोटो काढतो, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दररोज नवीन फोटो/व्हिडीओंची त्यात भर पडत जाते. मुव्हीजच्या मोठमोठय़ा आकाराच्या फाइल्स डाऊनलोड केल्या जातात. या सर्वाचा परिणाम साहजिकच मोबाइलची ‘स्पेस’ कमी होण्यात येतो. विशेषत: मोबाइलमधील गेम आपल्याला वाटते त्यापेक्षा किती तरी अधिक जागा व्यापत असतात. ज्या दिवशी ही गोष्ट आपल्या लक्षात येते, तेव्हा या सगळय़ा गोष्टी तपासून त्यातून अनावश्यक अ‍ॅप्स, गेम्स, फोटो, व्हिडीओ हटवणे, हे फार किचकट काम असते; परंतु अँड्रॉइड फोनमधून अशा अनावश्यक गोष्टी हटवण्याची सुविधा असते.

अ‍ॅप्स हटवण्यासाठी

१.     सेटिंगमध्ये जाऊन ‘स्टोअरेज’वर क्लिक करा. तेथून ‘अ‍ॅप्स’वर क्लिक करा.

२.     ‘अ‍ॅप्स’चा पर्याय निवडताच तुमच्या मोबाइलमध्ये कार्यान्वित असलेल्या सर्व अ‍ॅप्सची यादी तुम्हाला दिसू शकेल.

३.     सर्वसाधारणपणे सर्वाधिक जागा व्यापणारे ‘अ‍ॅप्स’ या यादीच्या वरच्या भागात असतात. तुम्ही हे अ‍ॅप ‘सिलेक्ट’ करून अनइन्स्टॉल करू शकता.

४.     मात्र, हे करण्यापूर्वी संबंधित अ‍ॅप आपल्या उपयोगाचे किंवा दैनंदिन वापराचे नाही ना, याची खात्री करून घ्या.

५.     तुम्हाला काही अ‍ॅप आवश्यक असतील; पण तरीही त्यांची जागा कमी करायची असल्यास, ‘अ‍ॅप्स’मध्ये जाऊन संबंधित ‘अ‍ॅप’ निवडून त्यातील ‘क्लीअर डेटा’ किंवा ‘क्लीअर केश्’ यापैकी एका बटणावर क्लिक करून त्या अ‍ॅपमधील ‘डेटा’ तुम्ही हटवू शकता. हे करण्यापूर्वी या ‘फाइल्स’नी किती जागा व्यापली आहे, याची माहितीही तुम्हाला मिळू शकते.

६. ‘क्लीअर डेटा’मुळे या अ‍ॅपमध्ये जमा झालेली तुमची माहिती, तुमच्या वापराचा तपशील आदी गोष्टी निघून जातात. थोडक्यात, ते अ‍ॅप ‘अनइन्स्टॉल’ करून पुन्हा ‘इन्स्टॉल’ केल्यासारखी ही प्रक्रिया आहे.

७. ‘क्लीअर केश्’च्या माध्यमातून अ‍ॅपसोबत मोबाइलमध्ये येणाऱ्या ‘टेंपररी फाइल्स’ दूर करता येतात. ‘क्लीअर केश्’ केल्याने तुम्ही जेव्हा ते अ‍ॅप सुरू करता, तेव्हा त्याचा वेग काहीसा कमी झाल्याचे तुम्हाला दिसेल. अन्यथा या प्रक्रियेचा अ‍ॅपवर फारसा परिणाम होत नाही.

फोटो, व्हिडीओ हटवण्यासाठी..

१. फोनची मोठी जागा छायाचित्रे व व्हिडीओंनी व्यापलेली असते. आपल्या फोनमध्ये फोटोंनी किती जागा व्यापली आहे, हे जाणून घ्यायचे असल्यास ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘स्टोअरेज’वर ‘क्लिक’ करा. तुम्हाला त्यात सर्व तपशील दिसून येईल.

२. आपल्या मोबाइलमधील छायाचित्रे किंवा व्हिडीओ ‘डिलीट’ करायचे असतील तर, सर्वप्रथम त्यांचा ‘बॅकअप’ घ्या. एकदा हटवलेली छायाचित्रे वा व्हिडीओ परत मिळवता येणार नाहीत. त्यामुळे ते हटवण्यापूर्वी ‘यूएसबी कॉर्ड’च्या साह्य़ाने आपल्या संगणकात हस्तांतर करणे कधीही चांगले.

३. याशिवाय तुम्ही तुमची छायाचित्रे वा व्हिडीओ ‘गुगल फोटो’च्या माध्यमातून अँड्रॉइडच्या ‘क्लाऊड स्टोअरेज’वरही जमा करू शकता. विशेष म्हणजे, ‘गुगल फोटोज’ एकाच प्रकारची छायाचित्रे असल्यास, त्यातील उत्तम छायाचित्रे ठेवून बाकीची हटवण्याची सूचनाही देते. उदा. तुमच्या मोबाइलमधील एकाच ठिकाणी सूर्यास्ताची पाच-सहा छायाचित्रे असतील तर त्यातील सर्वात चांगले आणि स्पष्ट छायाचित्र ठेवून बाकीची छायाचित्रे हटवण्याची सूचना ‘गुगल फोटो’ करते.

४. आपण जेव्हा मोबाइल कॅमेऱ्यातून छायाचित्रे काढतो, त्या वेळी अनेकदा आधीचे छायाचित्र नीट आले नाही म्हणून पुन्हा दुसरे छायाचित्र काढतो; परंतु खराब आलेले छायाचित्र आपल्या मोबाइलमध्ये राहते. अशा अनावश्यक, खराब, दर्जाहीन, अस्पष्ट छायाचित्रांमुळेही आपल्या फोनची स्टोअरेज क्षमता कमी होत असते. तुम्ही अशी छायाचित्रे ‘गुगल फोटो’च्या मदतीने हटवू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 5:07 am

Web Title: increase android mobile apps storage capacity
Next Stories
1 फोनसाठी ‘स्मार्ट’ वर्ष
2 ‘फीचर फोन’ना पसंती कायम
3 टेक-नॉलेज : या माहितीचे करू काय?
Just Now!
X