जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असा गवगवा करत काही महिन्यांपूर्वी भारतात ‘फ्रीडम २५१’ची जाहिरातबाजी करण्यात आली. अवघ्या अडीचशे रुपयांत स्मार्टफोन मिळणार हे ऐकल्यानंतर लाखोंच्या संख्येने ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी सुरू केली. यावरून बराच वादही झाला. पण अखेर ‘फ्रीडम २५१’ बाजारात आला असून सुरुवातीच्या ५ हजार ग्राहकांना तो पोहोचवण्यात येणार आहे. पण हा स्मार्टफोन नेमका आहे तरी कसा?

स्वस्तातला स्मार्टफोन ही संकल्पना भारतात सातत्याने वापरण्यात येते. प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतीय बाजारपेठेतील तळाच्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेक देशी परदेशी कंपन्यांनी अगदी दीड हजारांपासून आठ हजारांपर्यंतचे स्मार्टफोन बाजारात आणले. मात्र, काही महिन्यांपूर्वी ‘फ्रीडम २५१’या नावाने जाहिरातबाजी करण्यात आलेल्या स्मार्टफोनने केवळ भारताचेच नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. अवघ्या अडीचशे रुपयांत स्मार्टफोन मिळवून देण्याचा दावा करत ‘फ्रीडम २५१’साठी पूर्वनोंदणी सुरू करण्यात आली. ज्या दरात सिमकार्ड मिळतात, त्या दरात स्मार्टफोन मिळणार, हे ऐकल्यानंतर लाखो भारतीयांनी त्यावर उडय़ा मारल्या आणि अडीचशे रुपये भरून त्यासाठी नोंदणी केली. परंतु, काही दिवसांतच हा सगळा बनाव असल्याचा आरोप होऊ लागला आणि आपले अडीचशे रुपये गेले असा या नोंदणीकर्त्यांचा समज झाला. मात्र, सरकारी हस्तक्षेप, काही कंपन्यांचे आरोप आणि सामान्य ग्राहकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ‘फ्रीडम २५०’ आता सज्ज झाला आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात हा फोन बनवणाऱ्या ‘रिंगिंग बेल्स’ या कंपनीने ‘फ्रीडम २५१’चे सादरीकरण केले. त्याचवेळी गेल्या शुक्रवारपासून पाच हजार नोंदणीकर्त्यांना फोनची डिलिव्हरी करण्यात येईल, असे जाहीरही करण्यात आले.
* फ्रीडम २५१’ सुरुवातीच्या पाच हजार जणांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे आता या फोनसाठी नोंदणी करणाऱ्या साडेसात कोटी ग्राहकांच्या आशाअपेक्षा उंचावल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात हा स्मार्टफोन कसा आहे, याची उत्सुकता प्रत्येकालाच लागून राहिली आहे.
* फ्रीडम २५१’च्या सादरीकरणाच्या वेळी उपस्थित असलेल्या ‘गॅझेट ३६०’ या संकेतस्थळाच्या प्रतिनिधीने हा स्मार्टफोन हाताळला आणि त्याचे परीक्षण आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या परीक्षणातील काही ठळक मुद्दे..
* ‘लूक’च्या बाबतीत ‘फ्रीडम २५१’ हा स्वस्तातील अँड्रॉइड स्मार्टफोनसारखाच दिसतो. राखाडी, काळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.
* उजव्या हाताला ‘पॉवर’ बटण आणि डाव्या हाताला ‘व्हॉल्यूम’ची बटणे असलेल्या या स्मार्टफोनचे चार्जिग आणि हेडफोनसाठीचे पॉइंट वरच्या बाजूला पुरवण्यात आले आहेत.
* या स्मार्टफोनच्या पृष्ठभागावर कॅपेसिटिव्ह नॅव्हिगेशन बटण आहेत. चार इंचाची स्क्रीन असलेल्या या फोनचा डिस्प्ले अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत अतिशय अंधुक वाटतो.
* फोनच्या मागच्या भागातील कव्हर सहज काढता येते. कव्हर उघडल्यानंतर आतल्या बाजूस १४५० एमएएच क्षमतेची बॅटरी, दोन सिमकार्ड स्लॉट आणि एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट पुरवण्यात आला आहे.
* मागील बाजूला ३.२ मेगापिक्सेलचा कॅमेरा असून सोबत एलईडी फ्लॅश लाइटही पुरवण्यात आली आहे. पुढील बाजूस ०.३ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे.
* या फोनमध्ये अँड्रॉइड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टीम पुरवण्यात आली आहे.
* होमस्क्रीनवर मेसेजिंग, कॉलिंग, वेबब्राऊजिंग आणि कॅमेऱ्याचे चार आयकॉन तळाशी दिसतात. गुगलचे अ‍ॅप आणि क्लॉक, कॅलेंडर, ईमेल यासारखे नियमित अ‍ॅप वगळता कोणतेही अ‍ॅप या मोबाइलमध्ये उपलब्ध नाहीत. ते डाऊनलोड करावे लागतील.
* या फोनचा प्रोसेसर १.३ गिगाहार्ट्झचा क्वाडकोअर प्रोसेसर असून त्यात एक जीबी रॅम आहे.