29 January 2020

News Flash

खेळू आनंदे

क्रॅशलॅण्ड्स हा गेम २०१६च्या सुरुवातीला बाजारात दाखल झाला आहे.

कॅण्डीक्रश, टेम्पल रन, सब वे सर्फर असे लोकप्रिय मोबाइल गेम्स खेळून कंटाळलेल्या मोबाइल जीवांसाठी या वर्षांत अनेक नव्या गेम्सचे पर्याय समोर उभे राहणार आहेत. यातील काही गेम्स २०१६ मध्ये बाजारात उपलब्ध झाले आहेत तर काही गेम्स लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पैसे न भरल्यामुळे पुन:पुन्हा त्याच त्याच पातळ्यांवर खेळण्यापेक्षा वेगळ्या गेम्सचा पर्यायही आपण आजमावू शकतो. गुगलच्या अ‍ॅप बाजारात उपलब्ध शेकडो गेम्सपैकी काही सर्वोत्तम पर्याय पाहुयात.

क्रॅशलॅण्ड्स

क्रॅशलॅण्ड्स हा गेम २०१६च्या सुरुवातीला बाजारात दाखल झाला आहे. या गेमच्या शिरपेचात ‘बेस्ट गेम्स एव्हर मेड’ असा तुराही खोवला गेला आहे. हा गेम थरारक व्हिडीओ गेम्ससारखाच आहे. या गेममधील पात्र परग्रहावर जाऊन पोहचते. त्यानंतर त्या ग्रहावर एकच प्रकारचा गोंधळ उडतो. यातून आपल्याला जगाला वाचविण्यासाठी विविध मार्गाने लढा द्यावा लागतो. या गेमचे वैशिष्टय़ म्हणजे तो भरपूर तासांचा विकसित करण्यात आला आहे. यामुळे तो संपत नाही. तसेच या अ‍ॅपमध्ये कोणत्याही पायरीवर खरेदी करावी लागत नाही.

माइनक्राफ्ट

सर्व वयाच्या लोकांना आवडेल असा हा गेम आहे. व्हिडीओ गेमची मोबाइल आवृत्ती असल्यामुळे याला माइनक्राफ्ट पॉकेट एडिशन असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला एका विशाल अशा विश्वात नेण्यात आले आहे. जेथे तुम्हाला जगण्यासाठी लढा द्यायचा आहे. प्रसंगी जेवण शिजवावे लागेल तर प्रसंगी वाईट वृत्तींच्या माणसांसोबत लढाही द्यावा लागेल. हा प्रवास एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाणारा आहे. हा गेम सव्‍‌र्हायव्हर आणि क्रिएटिव्ह या दोन विभागांमध्ये उपलब्ध आहे. तसेच हा खेळ स्थानिक वाय-फायच्या मदतीने एकाच वेळी एकापेक्षा जास्त खेळाडूही खेळू शकतात. या खेळात, लेण्या, गावे अशी विविध ठिकाणेही देण्यात आली आहेत. हा खेळ खेळत असताना तुम्हाला सातत्याने काही तरी नवीन कल्पना शोधावी लागणार आहे. यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीलाही वाव देऊ शकता.

फॉलआऊट शेल्टर

या गेममध्ये तुम्हाला एक आश्रयगृह बनवायचे असते. तसेच यामध्ये लोकांना राहायला घेऊन जायचे असते. हे करत असताना वाटेत येणारे अडथळे दूर करत पुढचा टप्पा गाठायचा आहे. तसेच यात वाईट वृत्तींचा सामनाही करावा लागतो. हा गेम इतका मोठा तयार करण्यात आला आहे की तुम्ही तो किमान महिनाभर तरी खेळू शकता. हा गेम पूर्णपणे मोफत असून त्याला कोणत्याही टप्प्यासाठी पैसे मोजावे लागत नाही.

द रूम सीरिज गेम्स

अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलच्या सुरुवातीच्या काळात या गेम्सनी सर्वाना आकर्षित केले होते. या गेमची नवी आवृत्ती व नवी रचना नुकतीच अ‍ॅप बाजारात आली आहे. या गेममध्ये एका खोलीत चित्र-विचित्र वस्तू ठेवलेल्या असतात. या वस्तूंच्या मागचे रहस्य शोधण्याचे आव्हान खेळाडूला पेलायचे असते. हा खेळ जिंकण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वस्तूंचे रहस्य उलगडावे लागणार आहे.

द जीओमेट्री वॉर 3

अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस, विण्डोज, लिनक्स, पीएस 3, पीएस4, एक्सबॉक्स 360, एक्सबॉक्स वन अशा सर्व व्यासपीठांवर खेळता येणारा हा गेम आहे. यामध्ये खेळाडूला जहाज चालवायचे असते. हे जहाज तो कोणत्याही दिशेला नेऊ शकतो. आपल्याला या प्रवासात येणाऱ्या इतर जहाजांना तोडायचे असते. समोरच्या जहाजावर हल्ला करताना ठोकर न देता ते तोडणे आवश्यक आहे. तसेच हे करत असताना शत्रूच्या हल्ल्यापासूनही आपल्या जहाजाचे संरक्षण करायचे असते. तसे झाल्यावर गेममध्ये गुण मिळतात. यामध्ये टप्प्याटप्प्याने काठिण्यपातळी वाढत जाते.

रिपटाइड

पाण्यातील शर्यतीचे खेळ जर तुम्हाला आवडत असतील तर हा गेम अशा खेळाडूंसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला पोलिसांपासून पळायचे असते. पळत असताना छुप्या मार्गाचा वापर करायचा आहे. हा वापर करताना खूप थरार रंगवण्यात आला आहे. तसेच पळ काढण्यासाठी एकापेक्षा एक सरस अशा कल्पनाही यात देण्यात आल्या आहेत.

ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो

हा गेम कमालीचे ग्राफिक वापरून विकसित करण्यात आला आहे. या गेममध्ये तुम्ही सॅन अ‍ॅड्रेसमध्ये असतात. तेथे एका टोळीचा तुम्ही भाग बनता. ही टोळी त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घेत असते. हे करत असताना तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ही आव्हाने पार करण्यासाठी यामध्ये विविध पर्याय देण्यात आले आहेत. त्याचा वापर यामध्ये  करता येतो.

सर्व गेम मोफत कसे?

अ‍ॅण्ड्रॉइड किंवा अ‍ॅपलच्या आयओएसवर असलेले गेम्स मोफत असल्याने ते सर्रास डाऊनलोड केले जातात. हे गेम्स ‘मोफत’ असतील तर मग ते बनवणारे डेव्हलपर्स किंवा कंपन्या यांना उत्पन्न कसे मिळते, हा प्रश्न पडतो. पण मोबाइल गेमिंगची ही ‘स्ट्रॅटेजी’ही हटके आहे. यातील प्रत्येक गेम मोफत डाऊनलोड करता येतो. तो खेळता खेळता वापरकर्त्यांला त्याचं व्यसन लागतं. मग, गेममध्ये पुढे येणाऱ्या कठीण पातळ्या पार करण्यासाठी त्याला ‘रिअल कॅश’, ‘कॉइन्स’ किंवा तत्सम नावे असलेल्या गोष्टी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. गेममध्ये आकंठ बुडालेले असंख्य लोक अशी खरेदी करतातच. त्यातूनच कंपन्यांची कमाई होते. याशिवाय गेम्स चालू असताना स्क्रीनवर झळकणाऱ्या जाहिराती हे उत्पन्नाचं साधन असतंच.

सुरक्षिततेचा प्रश्न

मोबाइलवरील अ‍ॅप्स वापरकर्त्यांची माहिती चोरत असल्याचे याआधीच उघड झाले आहे. यात गेम्सही मागे नाहीत. अनेक गेम्स खेळण्यासाठी ‘इंटरनेट कनेक्शन’ आवश्यक असते, ते याच कारणासाठी. गेम ‘इन्स्टॉल’ केल्यानंतर ते ‘तुमची काही माहिती हे अ‍ॅप्लिकेशन शेअर करू इच्छिते’ अशा स्वरूपाची सूचना पाठवते. गेम्स खेळण्याच्या नादात आपण याकडे लक्ष देत नाही. मात्र, पडद्यामागे आपली माहिती एका विशिष्ट सव्‍‌र्हरला पाठवली जात असते. शिवाय फेसबुक किंवा जीमेलच्या माध्यमातून लॉग इन करून आपले संपर्कही घेतले जातात.

nirajcpandit  – नीरज पंडित

Niraj.pandit@expressindia.com

First Published on February 7, 2017 5:18 am

Web Title: new game available on google play
Next Stories
1 स्टे फोकस्ड
2 टेक-नॉलेज : कन्सोल गेमिंग म्हणजे काय?
3 ‘४ के’ हटके!
Just Now!
X