समाज माध्यमांवर होणाऱ्या गुन्ह्य़ांमुळे अनेकदा पालक मुलांना त्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतात. मात्र तरुणाईला फेसबुकपासून वेगळे करणे अवघड आहे. म्हणूनच त्यांना त्यापासून लांब करण्यापेक्षा फेसबुकचा सुरक्षित वापर कसा करता येईल हे सांगणे योग्य ठरले. फेसबुकच्या एका विशेष टीमने नुकतेच विविध स्तरांवर अभ्यास करून फेसबुक खाते वापरणाऱ्या लोकांच्या सुरक्षा, त्रुटी जाणून घेऊन काही सुरक्षा टिप्स तयार केल्या आहेत. पाहुयात काय आहेत त्या टिप्स.

प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा
यामध्ये तुम्ही जे काही शेअर केले आहे ते कोण पाहू शकते हा पर्याय अनेकजण दुलक्र्षित ठेवतात. यामुळे आपल्याला जे फोटो केवळ काही ठरावीक लोकांपर्यंतच पोहोचवायचे असतील तर तसे होत नाही. यामुळे फोटो शेअरिंगसाठी ‘प्रायव्हेट’ या पर्यायाचा स्वीकार करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमधील ‘प्रायव्हसी चेकअप’ या पर्यायामध्ये जावे लागेल. तेथे तुम्हाला तुमची पोस्ट कोण पाहू शकतो याचे पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला पाहिजे तो पर्याय निवडता येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला फोटोबरोबरच तुमचा फोन नंबर किंवा ई-मेल आयडी दाखवायचा की नाही हेही सांगता येते. याचबरोबर ‘द ऑडियन्स सेक्टर’ म्हणून एक पर्याय आहे. ज्यामध्ये तुमचा फोटो कोण पाहू शकतो म्हणजे सर्व जण, तुमचे मित्र किंवा काही मर्यादित लोक जे तुम्ही निवडाल तेच पाहू शकतात हा पर्याय निवडणेही सोपे होते.
सिक्युरिटी सेटिंग्ज तपासा
सिक्युरिटी चेकअप्समध्ये तुम्हाला लॉकचा पर्याय येतो. तो पर्याय निवडल्यावर तुमचे खाते कुणीही हॅक करू शकणार नाही. यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्यापासून ते ब्राऊझरमधून किंवा अॅपमधून आपण पूर्णपणे लॉगआऊट होऊ शकतो. याचबरोबर इतर कोणी आपले खाते सुरू करण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्या ठिकाणाहून आणि किती वाजता केला याचा तपशील आपल्याला मिळू शकतो. हा तपशील मिळवण्यासाठी तुम्हाला लॉगइन अॅलर्ट्स सुरू करावे लागतील.
तुम्हाला त्रास देणाऱ्यांना ब्लॉक करा
जर तुम्हाला एखादी व्यक्ती त्रासदायक वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे प्रोफाइल ब्लॉक करू शकता. ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला अनफ्रेंड करून ब्लॉक करावे लागेल. हे एकदा तुम्ही केले की ती व्यक्ती तुम्हाला कधीच परत फेसबुकवर टॅग करू शकत नाही किंवा तुम्हाला शोधूही शकत नाही.
आक्षेपार्ह पोस्टबाबत तक्रारी
जर तुम्हाला फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या तर त्याची तक्रार तुम्ही थेट फेसबुककडे करू शकता. जेणेकरून फेसबुक त्यांच्यावर कारवाई करू शकते. यासाठी केवळ संबंधित पोस्टच्या बाजूला ‘रिपोर्ट लिंक’ हा पर्याय दिलेला असतो त्यावर क्लिक करावयाचे आहे.
हक्क असलेले फोटो परवानगीशिवाय शेअर करणे
जर एखाद्या व्यक्तीने त्याने पोस्ट केलेले छायाचित्र परवानगीशिवाय शेअर करू नये असे सांगितले असेल आणि जर ते शेअर केले गेले तर त्यावर फेसबुक कडक कारवाई करते. यासाठी तुम्ही त्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवणे फायद्याचे होईल. तुम्ही यामध्ये नावाशिवाय तक्रारही नोंदवू शकता. अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध सायबर सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होते. याचबरोबर ती पोस्ट हाइड करण्यापासून त्या व्यक्तीला ब्लॉक करण्यापर्यंत कारवाई करण्यात येते.
माहितीचे नियंत्रण
अॅप किंवा फेसबुक लॉगइनमधून तुम्ही शेअर करत असलेल्या माहितीचे नियंत्रण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेसबुकवरील ‘माहिती संपादित करा’ हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला अॅपसाठी आवश्यक तेवढी माहिती विचारली जाते. त्यातही तुम्ही कोणती माहिती देऊ इच्छिता याचे पर्याय निवडण्याची सुविधा दिली जाते. यात तुम्हाला अॅपसोबत काय शेअर करायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता.