केंद्र सरकारने इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि न्यायालयाच्या निर्देशांतर्गत गेल्या पाच वर्षांत हजोरो संकेतस्थळे आणि यूआरएलवर बंदी लागू केली आहे. बंदी घातलेल्या या यूआरएलला भेट दिल्यास कठोर कारवाई करण्याची पाऊले उचलण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या बंदी घातलेल्या संकेतस्थळांना (Blocked URL’s) भेट दिल्यास किंवा येथील कंटेट पाहिल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास अथवा तीन लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, असे मिळालेल्या माहितीवरून समजते. भारतात प्रतिबंध लागू करण्यात आलेली टोरेंट फाईल पाहिल्यास अथवा कोणत्याही होस्टवरून डाऊनलोड केल्यास आता शिक्षा भोगावी लागू शकते, असे ‘इंडिया टुडे’मधील वृत्तात म्हटले आहे. केवळ टोरेंट फाईल डाऊनलोड करणाऱ्यांसाठीच शिक्षेचे ही तरतूद नसून, प्रतिबंधित संकेतस्थळाला भेट दिल्यासदेखील तुरुंगाची हवा खायला लागू शकते, तसेच तीन लाखाच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. प्रतिबंध लागू केलेल्या संकेतस्थळाला भेट दिल्यास खालील सूचना तुमच्या कॉम्प्युटर अथवा मोबाईल स्क्रिनवर दिसेल.
या यूआरएलवर सरकारी प्राधिकरणाच्या निर्देशांतर्गत तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. या यूआरएलवर कशाही प्रकारचे कंटेट पाहणे, डाऊनलोड करणे, प्रदर्शित करणे अथवा नक्कल करणे भारतीय कायद्यांतर्गत दंडात्मक गुन्हा आहे. इतकेच नव्हे तर कॉपीराइट कायदा १९७७ चे कलम ६३, ६३-ए, ६५ आणि ६५-ए अंतर्गत तीन वर्षांचा तुरुंगवास तसेच तीन लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अशाप्रकारचा ब्लॉक करण्यात आलेला यूआरएल पाहण्यात आल्यास सदर व्यक्ती urlblock@tatacommunications.com येथे संपर्क साधू शकते. ४८ तासांच्या आत याबाबतच्या कारवाईची माहिती तुम्हाला पुरविण्यात येईल. ज्यायोगे तुम्ही उच्च न्यायालय अथवा संबंधित संस्थेशी संपर्क साधून तुमचे म्हणणे मांडू शकता.
भारतात यूआरएल आणि संकेतस्थळांना जास्त करून डीएनएस- फिल्टरिंग (DNS-filtering) द्वारे ब्लॉक करण्यात आले आहे. याचा अर्थ इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या यादीत ब्लॉक संकेतस्थळाचा डीएनएस सामाविष्ट केलेला असतो. जेव्हा वापरकर्ता या संकेतस्थळाला भेट देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सर्व्हिस प्रोव्हायडरचा डीएनएस सर्व्हर त्याची रिक्वेस्ट ब्लॉक करतो.