इंटरनेटच्या महाजालाचे सर्वात लोकप्रिय वैशिष्टय़ म्हणजे व्हिडीओ. इंटरनेटच्या विश्वात जगाच्या कानाकोपऱ्यातून दररोज लाखोंच्या संख्येने जमा होणाऱ्या ध्वनिचित्रफिती आपल्याला सहज पाहायला मिळतात. यामधील सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यू-टय़ुब. ज्याप्रमाणे माहितीच्या महाजालात काहीही ‘सर्च’ करायचं असेल तेव्हा आपण ‘गुगल’ करतो. त्याप्रमाणे कोणताही व्हिडीओ पाहायचा म्हटलं तर पहिल्यांदा यू-टय़ुबकडे बोटं वळतात. त्यामुळेच यू-टय़ुब हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय संकेतस्थळ आहे. तब्बल एक अब्जाहून अधिक वापरकर्ते, महिन्याला ९० लाखांहून अधिक ‘व्ह्यूज’ आणि ७६ भाषांमधील व्हिडीओ, या आकडेवारीतच यू-टय़ुबची लोकप्रियता समजून येते. संगणकावरच नव्हे तर स्मार्टफोनवरही यू-टय़ुब हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर दिवसाला तब्बल ३०० तासांच्या ध्वनिचित्रफिती पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवसभर यू-टय़ूब पाहण्याचा विचार केला तरी २४ तास कमी पडतील. यू-टय़ुबचा भारतातील वापरही मोठा आहे. असे असले तरी यू-टय़ुबवरील अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्याला माहीत नसल्यामुळे त्याचा आपण फायदा घेऊ शकत नाही. यू-टय़ुबच्या वापराला अधिक उपयुक्त आणि सक्षम करणाऱ्या अशाच काही युक्त्या..
जगात कुठे.. काय..?
यू-टय़ुवरून आपण जगाच्या कानाकोपऱ्यातील व्हिडीओच पाहू शकतो हे खरे असले, तरी या संकेतस्थळावरील ‘लोकेशन’ सुविधेमुळे आपण ज्या देशात असतो, त्या देशातील व्हिडीओंना संकेतस्थळावर पहिले प्राधान्य दिले जाते. मात्र, हे टाळून आपण कोणत्याही देशातील लोकप्रिय व्हिडीओ पाहू शकतो. यासाठी यू-टय़ुबच्या अ‍ॅपच्या वरच्या बाजूला असलेल्या उजव्या कोपऱ्यातील ‘तीन उभ्या डॉट’वर ‘क्लिक’ करा. तेथे ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘जनरल’वर ‘क्लिक’ करा. या ठिकाणी ‘कंटेन्ट लोकेशन’चा पर्याय असेल. या यादीवर ‘क्लिक’ केल्यावर सर्व देशांची यादी आपल्याला दिसेल. यातील कोणत्याही देशाच्या नावावर क्लिक करून आपण तेथील महत्त्वाच्या किंवा ‘ट्रेंडिंग’ व्हिडीओज पाहू शकतो.
‘ऑटो प्ले’ला पर्याय
यू-टय़ुबवर कोणताही व्हिडीओ ‘सर्च’ केल्यानंतर त्या यादीतील ‘व्हिडीओ’ची यादी समोर येते. अशावेळी पहिला व्हिडीओ आपोआप ‘प्ले’ होतो. हे टाळण्यासाठी ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘जनरल’वर क्लिक केल्यास आपल्याला समोर ‘ऑटो प्ले ऑन/ऑफ’चा पर्याय दिसतो. त्यापैकी ‘ऑफ’चा पर्याय निवडून आपण ‘ऑटो प्ले’ची सुविधा बंद करू शकतो.
इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण
यू-टय़ुबवरून व्हिडीओ पाहण्याचा आनंद मिळत असला तरी यात आपल्या मोबाइल इंटरनेटचा प्रचंड डेटा वापरला जातो. त्याचा फटका आपल्या मोबाइल बिलाच्या वाढण्यात होतो. हे टाळण्यासाठी यू-टय़ुबवरील डेटा वापरावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. शिवाय ‘एचडी’ किंवा ‘ फुल एचडी’ व्हिडीओऐवजी कमी ‘रेझोल्युशन’मध्ये व्हिडीओ पाहण्याची सोयही करून घेऊ शकता. त्यासाठी ‘सेटिंग’मध्ये ‘जनरल’वर क्लिक करून ‘लिमिट मोबाइल डेटा युसेज’ हा पर्याय निवडा. हा पर्याय ‘ऑफ’ केल्यास तुम्ही पाहत असलेले सर्व व्हिडीओ कमी रेझोल्युशनमध्ये दिसतील. त्यामुळे तुमच्या इंटरनेट डेटाची बचत होईल. केवळ ‘वायफाय’मध्ये तुम्हाला ‘एचडी किंवा फुल एचडी’ व्हिडीओ पाहता येतील.
व्हिडीओच्या मागच्या गोष्टी
एखाद्या व्हिडीओच्या निर्मितीत झालेल्या बदलांचीही यू-टय़ुबवर नोंद ठेवली जाते. यासाठी ‘सेटिंग’मधून ‘जनरल’वर जाऊन ‘स्टॅट्स फॉर नर्ड्स’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक व्हिडीओतील तांत्रिक गोष्टी तुम्हाला दिसू शकतील.
नंतर पाहण्यासाठी..
यू-टय़ुबवर दररोज असंख्य व्हिडीओची भर पडत असते. अशा वेळी आज पाहिलेला ‘व्हिडीओ’ दुसऱ्या दिवशी शोधूनही सापडणे जरा कठीणच. त्यामुळेच यू-टय़ुबने ‘सेव्ह व्हिडीओ’ ही सुविधा दिली आहे. एखादा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास आणि तो नंतर पाहायचा असल्यास तुम्ही तो ‘सेव्ह’ करून ठेवू शकतात. त्यासाठी या व्हिडीओच्या ‘विंडो’मधील ‘+’ या चिन्हावर क्लिक करा.
उपशीर्षकांची सुविधा
यू-टय़ुबवर ‘उपशीर्षके’ अर्थात ‘सबटायटल्स’ची सोयही करून देण्यात आली आहे. एखाद्या वेळीस आपल्याला आवाज ऐकता येत नसेल किंवा भाषा समजत नसेल त्यावेळी ‘उपशिर्षके’ उपयोगी पडतात. त्यासाठी ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘कॅप्शन्स’वर क्लिक करा. तेथून तुम्ही ‘कॅप्शन्स’ची भाषा, त्याच्या फॉन्टचा आकार, रंग निवडू शकता.
मुलांनी काय पाहावे?
‘यू-टय़ुब’वर सर्व प्रकारचे व्हिडीओ उपलब्ध असतात. यातील काही व्हिडीओ केवळ प्रौढांसाठी किंवा १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी असतात. साहजिकच आपण जेव्हा व्हिडीओ पाहतो, तेव्हा आपल्या वयाची नोंद घेऊन यू-टय़ुबवर तसे व्हिडीओ दिसतात. परंतु, एखादेवेळीस आपला मोबाइल मुलांच्या हातात पडला तर असे आक्षेपार्ह व्हिडीओ त्यांच्या दृष्टीस पडण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी यू-टय़ुबवर ‘पॅरेंटल कंट्रोल’ अर्थात ‘पालक नियंत्रण’ ही सुविधा उपलब्ध असते. ही सुविधा सुरू करण्यासाठी ‘सेटिंग’मधून ‘जनरल’वर जाऊन ‘रिस्ट्रिक्टेड मोड’ हा पर्याय निवडा.