सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण असंख्य प्रकारची कामे करीत असतो. त्यातील काही पूर्वनियोजित असतात आणि काही अचानक उद्भवलेली. बरेचदा अचानक आलेल्या कामांना जास्त प्राधान्य दिले जाते. त्या गडबडीत आपण काही कामे विसरून जातो. ही कामे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून काही जण मोबाइलवर रिमाइंडर लावतात. पण हा रिमाइंडर वाजायच्या वेळीच आपण जर दुसरे महत्त्वाचे काम करीत असलो तर मोबाइलला पुन्हा एक-दोन तासांनी रिमाइंडर द्यायला सांगतो. काही वेळा नादात तो बंद करून टाकतो आणि काही वेळा ती गोष्ट करायला पूर्णपणे विसरून जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वेळी स्टिकी नोट्सचा (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.gs.stickit&hl=en) आपल्याला नक्कीच फायदा होऊ  शकतो. या स्टिकी नोट्स तुम्हाला तुमचे टेबल, संगणक, फ्रीज यावर चिकटवून ठेवायची गरज नाही. कारण ‘स्टिकी नोट्स’ अ‍ॅप्सच्या माध्यमातून या नोट्स तुम्ही केव्हाही स्क्रीनवर बघू शकता. महत्त्वाचे फोन करण्याव्यतिरिक्त सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी, वेळ-तारीख-वार पाहण्यासाठी अशा अनेक कारणांनी मोबाइल हाताळत असतो. अशा वेळी जर हे अ‍ॅप्लिकेशन तुम्ही उघडले तर ज्या कामांच्या नोट्स तयार केल्या आहेत, त्या टायटलनुसार स्क्रीनवर दिसतील. ज्या नोट्सची आवश्यकता नाही त्या तुम्ही डिलिट करू शकता.

हे अ‍ॅप वापरणे अतिशय सोपे आहे. अ‍ॅप सुरू केल्यावर उजवीकडे खाली असलेल्या अधिक (+) चिन्हाला बोट लावल्यास नवीन नोट तयार करता येते. नोट टाइप करून झाल्यावर ‘बरोबर’ च्या चिन्हावर खूण केल्यास ती नोट तयार होऊन स्क्रीनवर दिसू लागते. त्या नोटला परत स्पर्श केल्यास ती एडिट करण्यासाठी उघडली जाते. स्टिकी नोट्स बनवताना त्याच्या फाँटचा आकार लहान मोठा करू शकता. नोटच्या कागदाचा रंग बदलू शकता. ही नोट इतरांबरोबर शेअरदेखील करता येते. या नोट्साठी रिमाइंडरही लावता येतो. गंमत म्हणजे नोटवर लिहिलेला संदेश टेक्स्ट टु स्पीच पद्धतीने ऐकून दाखवण्याचीही सोय यात उपलब्ध आहे.

या अ‍ॅपद्वारे आपण अमर्यादित संख्येने नोट्स बनवू शकतो. या नोट्स आपण नोट्सच्या रंगानुसार, तयार करण्याच्या तारीख-वेळेनुसार किंवा अक्षरांनुसार सॉर्ट करता येतात. नोट्सचा बॅकअप ड्रॉप-बॉक्समध्ये घेता येण्याची सोय येथे उपलब्ध आहे.

लहानथोर सर्वच मंडळींना विविध गोष्टींची आठवण करून देण्याची गरज पडतेच. या सुटसुटीत अ‍ॅपद्वारे कामात व्यवस्थितपणा आणून आपली कार्यक्षमता सुधारणे आपल्या हातात आहे. बघणार ना प्रयत्न करून!

मनाली रानडे – manaliranade84@gmail.com

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sticky notes android apps on google play
First published on: 20-09-2016 at 04:24 IST