तुम्हाला प्रत्येक क्षणाचा सेल्फी टिपायची सवय असेल तर सध्या बाजारात एकापेक्षा एक चांगले सेल्फी फोन उपलब्ध आहेत. यातच आता व्हिवोचा व्ही५ हा फोन बाजारात आला आहे. हा फोन बाजारातील जिओनी एस ६एस आणि ओप्पो एफ१एस या फोनना स्पर्धा ठरणार आहे, कारण या फोनमध्ये २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिवोच्या व्ही मालिकेतील हा व्ही५ फोन महिनाभरापूर्वी बाजारात दाखल झाला आहे. पाहूयात कसा आहे हा फोन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिवो व्ही५ रचना

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोनसारखाच दिसणारा हा फोन आहे. या फोनच्या रचनेत आयफोन ६चा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो. पुढच्या बाजूने हा फोन वनप्लस ३ किंवा ओप्पोसारखा भासतो. मात्र या फोनचा उत्पादन दर्जा खूपच चांगला आहे. यात कोर्निग गोरिला ग्लास वापरण्यात आली आहे. ज्याचा फायदा डिस्प्लेच्या संरक्षणासाठी केला जाणार आहे. हा फोन पातळ आणि वजनानेही हलका आहे. फोनची जाडी कमी असली तरी तो हातात चांगल्या प्रकारे राहू शकतो. फोनच्या खालच्या बाजूला हेडफोन सॉकेट, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि स्पीकर्स देण्यात आले आहेत, तर मागच्या बाजूस बोटाच्या ठशांची सुविधा देण्यात आली आहे. फोनच्या डाव्या बाजूस दोन सिमकार्ड व एक मेमरी कार्ड ठेवण्यासाठीचा स्लॉट आहे. या फोनसोबत चार्जर, हेडफोनसह एक सिलिकॉन केस देण्यात आली आहे, जेणेकरून फोनचे सुरक्षा कवच शोधण्यासाठी धावपळ करायची गरज भासणार नाही.

काय आहे या फोनमध्ये

या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडिया टेक एमटी ६७५० एसओसी प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर याआधी ओप्पो एफ१ एस या फोनमध्ये वापरण्यात आला आहे. फोनमध्ये चार जीबी रॅम, तर ३२ जीबीची अंतर्गत साठवणूक देण्यात आली असून कार्डच्या साह्य़ाने साठवणूक १२८ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. यामुळे फोन अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. फोनची काम करण्याची पद्धतही अगदी जलद असल्यामुळे एक क्लिक केल्यावर काही वेळ थांबावे लागण्याच्या त्रासातून सुटका मिळणार आहे. यामध्ये चांगल्या दर्जाचे ग्राफिक कार्ड वापरण्यात आले आहे. यामुळे गेम्स खेळण्याचा अनुभवही खूप चांगला मिळतो. फोनमध्ये वायफाय ८०२.११, ब्लूटय़ूथ ४.०, यूएसबी ओटीजी, जीपीएस आणि एफएम रेडिओ देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये व्हिवोची फनटच ओएसची २.६ आवृत्ती देण्यात आली आहे. ही आवृत्ती सध्याच्या अँड्रॉइड मार्शमॅलोवर आधारित आहे. अँड्रॉइडच्या मुख्य आवृत्तीत व्हिवोने केलेल्या सुधारणांमुळे फोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. सध्या बहुतांश कंपन्या आपल्या फोनमध्ये अधिक सुविधा देण्यासाठी ओएसमध्ये अधिक बदल करू लागले आहेत. यात व्हिवोचाही समावेश आहे. या फोनला ५.५ इंचाचा डिस्प्ले दिला असून यात अत्याधुनिक रंगसंगती देण्यात आली आहे. डिस्प्लेचा पॅनल एएमओएलईडी देण्यात आला आहे. याचा एचडी डिस्प्ले असला तरी मजकुराच्या दर्जावर फारसा परिणाम झालेला नाही. याला बॅकेलाइटचे नेव्हिगेशन बटण देण्यात आले आहे. तसा होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर बसविण्यात आला आहे. या सेन्सरची मदत फोन अधिक सुरक्षित करण्यासाठी होऊ शकतो. या फोनमधील आयओएस प्रभावित इंटरफेसमुळे पहिल्यांदाच व्हिवोचा फोन वापरणाऱ्यांना थोडा गोंधळात टाकणारा आहे. या फोनमध्ये सध्या सुरू असलेले अ‍ॅप्स खालच्या बाजूने स्क्रीनवर केल्यावर दिसणार आहेत. याशिवाय यात अ‍ॅनिमेटेड होमस्क्रीनचा पर्यायही देण्यात आला आहे. यात आपण जर व्हिडीओ पाहात असू आणि जर एखादा संदेश आला तर व्हिडीओ स्क्रीन छोटी होते. यामुळे व्हिडीओही पाहता येतो. या फोनमध्ये फोरजी आणि व्हीओएलटीची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे जिओच्या सिमकार्डसाठी व्हीओएलटीई कॉल्स करणे शक्य होणार आहे.

कॅमेरा

सध्या कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे व त्याचा दर्जा काय यावरून अनेक जणांची फोनची निवड ठरत असते. व्हिवोने हेच लक्षात घेऊन या फोनमध्ये तब्बल २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सोनीच्या सेन्सरने बनविण्यात आला असून यात २.० चा अपार्चर देण्यात आला आहे. यात फिक्स्ड फोकस लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेऱ्याचा पूर्णत: एचडी व्हिडीओ रेकॉर्डिगसाठी उपयुक्त ठरणार आहे. याचे विशेष म्हणजे यात दिवसाच्या उजेडात छायाचित्रण करण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. अंतर्गत छायाचित्रणासाठीही हा कॅमेरा अधिक चांगला ठरत आहे. व्हिवो व्ही५ या फोनमध्ये ‘मूनलाइट फ्लॅश’ देण्यात आला आहे. यात उजेडावर मात करत तुमच्या चेहऱ्यावर विशेष फोकस केले जाते. यातील ‘वन टॅप मेकओव्हर’ या पर्यायामुळे तुम्ही तुमचा सेल्फी अधिक चांगला करू शकता. या कॅमेऱ्यामुळे व्हिवोने मुख्य कॅमेऱ्याकडे थोडे दुर्लक्ष केल्याचे जाणवतो. त्या कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हे अगदी सुमार दर्जाचे असून उजेडातील छायाचित्रांचा दर्जाही फारसा चांगला नाही. यामुळे फ्रंट कॅमेऱ्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता अधिक चांगली देण्यात आली आहे. या फोनमध्ये बाहेर काढता न येणारी ३००० एमएएचची क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा फोन सुमारे ११ तास पूर्णवेळ काम करू शकतो.

थोडक्यात

जर तुम्हाला कमी पैशांत चांगल्या दर्जाचा सेल्फी कॅमेराफोन घ्यायचा असेल तर हा पर्याय एकदम उत्तम ठरू शकतो.

किंमत – याची किंमत १८९८० रुपये असून ई-व्यापार संकेतस्थळांवर ती कमी आहे.

@ Nirajcpandit

 नीरज पंडित – Niraj.pandit@expressindia.com

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo selfie smartphone
First published on: 27-12-2016 at 01:22 IST