करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी निधी; अत्याधुनिक रुग्णवाहिकेचाही पुरवठा

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेत  मंगळवारी

आढावा बैठक घेतली. यावेळी १० कोटी रुपये आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका पालिकेला राज्य शासनामार्फत देणार असल्याचे त्यांनी सांगितले मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. महानगरपालिकेला करोनाविरोधात लढा देण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अधिकाअधिक करोना चाचणी करून करोनाचा प्रसार रोखण्याची गरज असल्याच्या सूचना त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिल्या.

येत्या काळात मीरा-भाईंदर शहरात लवकरच कोविड रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यात येणार असून जलद चाचण्यांकरिता १ लाख १० हजार प्रतिजन किट राज्य शासनाकडून उपलब्ध  करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णांना ऑक्सिजन खाटा, औषध, अन्न सुविधा आणि अतिदक्षता विभाकरीता १० कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच रुग्णांच्या सुविधेसाठी २ अत्याधुनिक रुग्णवाहिका राज्य शासनामार्फत आणि १ आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मृत्यूदर कमी करण्याचे आदेश

मीरा-भाईंदरमधील करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असली तरी मृत्यूदरही चिंतेचा विषय आहे. त्यामुळे येत्या काळात बाधित रुग्णांच्या संपर्कातील किमान दहा व्यक्तीची चाचणी करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिले.