पोलीस तपासात माहिती उघड; पैशांसाठीच खून केल्याचे स्पष्ट
खंडणीतून १५ लाख रुपये कमवायचे, पण अपहरण केलेल्या नयनला मात्र जिवंत सोडायचे नाही, असा निर्णय तिघा अपहरणकर्त्यांनी आधीच घेतल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. तिघांपैकी राजू मोरे हा आरोपी नयनचे वडील संतोष जैन यांच्या दुकानात कामाला असल्यामुळे नयन त्याला ओळखत होता. यामुळे खंडणीची रक्कम वसूल केल्यानंतर नयनला जिवंत सोडले तर आपले पितळ उघडे पडेल, अशी भीती राजूला होती. यातूनच त्याने नयनची हत्या केल्याची बाबही पुढे आली आहे. तसेच तिघा आरोपींना पैशांची निकड असल्यामुळे त्यांनी हा गुन्हा केल्याचेही समोर आले आहे.
कल्याण येथील गांधी चौक परिसरातील कपडय़ाचे व्यापारी संतोष जैन यांचा मुलगा नयन (७) याच्या हत्येमुळे शहर हादरले आहे. १५ लाखांच्या खंडणीसाठी तिघा अपहरणकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी राजू यशवंत मोरे (२४), देशराज सोनवीर कुशवाह (२२) आणि विजय दुर्गाप्रसाद दुबे (१९) या तिघा अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी राजू मोरे हा वांगणी, तर विजय आणि देशराज हे दोघे कल्याण परिसरात राहतात. कल्याण येथील गांधी चौक परिसरात नयनचे वडील संतोष जैन यांचे कपडय़ाचे दुकान आहे. तिघा अपहरणकर्त्यांपैकी राजू आणि विजय हे दोघे संतोष यांच्याकडे कामाला होते, मात्र वर्षभरापूर्वी दोघांनी काम सोडले होते. पूर्वी कामाला असल्यामुळे दोघांना त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती होती. यातूनच तिघांनी नयनचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी वसूल करण्याचा कट रचल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. या तिघांनी त्याला वांगणीतील एका बंगल्यात डांबून ठेवले होते. तसेच नयनला जिवंत सोडले तर आपण अडकू, अशी भीती राजूला होती. यामुळे कुशवाह आणि राजू या दोघांनी त्याला मोटारसायकलवरून मुरबाडच्या जंगलात नेले. तिथे जात असतानाच दोघांपैकी एकाने त्याला झोपेची गोळी टाकलेले पाणी पाजले आणि त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केली. या हत्येनंतर मृतदेह फेकून दोघांनी तेथून पळ काढला,.
नियोजनबद्घ कट..
सात वर्षीय नयनचे अपहरण करताना कोणताही गोंधळ होऊ नये, तसेच त्याने आरडाओरडा करू नये, यासाठी तिघा अपहरणकर्त्यांनी कट रचला होता. त्यानुसार राजू आणि देशराज या दोघांनी नयनची शाळेत जाण्याची आणि परतण्याची वेळ, याची रेकी केली होती. तसेच नयनच्या अपहरणासाठी कुशवाह याने त्याच्या वडिलांची मोटारसायकल चोरली. त्याच मोटारसायकलवरून राजू याने नयनचे अपहरण केले. ‘तुझ्या वडिलांनी बोलाविले आहे,’ अशी बतावणी करत राजूने त्याचे अपहरण केले.

गुंतवणुकीतून आर्थिक फटका
संतोष जैन यांच्या कपडय़ाच्या दुकानात कामाला असलेल्या राजू मोरे याने वर्षभरापूर्वी नोकरी सोडली होती आणि त्यानंतर तो कपडे होलसेल भावात विकण्याचे काम करीत होता. त्याला कपडय़ाचा मोठा व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्याला पैशांची गरज होती. कल्याण येथील गांधी चौक परिसरातील एका इमारतीमध्ये देवराज कुशवाह हा सुरक्षारक्षकाचे काम करायचा. याच परिसरात जैन यांचे दुकान असल्यामुळे राजूची त्याच्यासोबत ओळख होती. देवराजचे लग्न ठरले होते आणि येत्या तीन महिन्यांनंतर त्याच्या लग्नाची तारीख ठरविण्यात आली होती. यामुळे त्याला पैशांची फार गरज होती. संतोष जैन यांच्याकडे विजय दुबे हा पूर्वी काम करीत होता, मात्र सध्या तो त्यांच्या एका नातेवाईकाकडे कामाला होता. त्यांच्या शेअर बाजार व्यवसायासंबंधीचे तो काम पाहत होता. तसेच त्यानेही या व्यवसायात गुंतवणूक केली होती, मात्र त्यामध्ये त्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे त्यालाही पैशांची चणचण भासत होती. यातूनच या तिघांनी १५ लाखांच्या खंडणीसाठी नयनच्या अपहरणाचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली.