जवाहरबाग येथे १०० फुटी चिमणी

ठाणे : खारटन रोड येथील जवाहरबाग स्मशानभूमीच्या परिसरात दहनविधीनंतर पसरणाऱ्या धुरामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याबद्दल तक्रारी येऊ लागल्यानंतर महापालिकेने येथे १०० फूट उंच चिमणी बसवली आहे. त्यामुळे खारटन रोड परिसरातील नागरिकांची धुरापासून मुक्तता होणार आहे.

जवाहरबाग या स्मशानभूमीचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले असून या ठिकाणी गॅस दाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. नूतनीकरण केल्यानंतर महापालिकेने या ठिकाणी उंच चिमणी बसविण्याचे काम पूर्ण केले नव्हते. त्यामुळे मृतदेहाच्या अत्यसंस्कारानंतर परिसरात धूर पसरत आहे. स्मशानभूमीच्या परिसरात उंच टॉवर तसेच लोकवस्ती असल्याने निघणारा धूर थेट नागरिकांच्या तोंडा-नाकात जात होता. त्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास होऊन मळमळणे, डोळे चुरचुरणे, डोकेदुखी याचा त्रास होऊ लागला आहे. याविषयी येथील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. यानंतर महापालिकेने येथे चिमणी उभारण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्मशानभूमीची पाहणी केल्यानंतर येथे २० ऑगस्टपर्यंत चिमणी उभारली जाईल असा दावा केला होता. मात्र, मुदत उलटूनही चिमणी उभारली गेली नव्हती. महापालिकेच्या या दिरंगाईच्या कारभाराविषयी पुन्हा एकदा येथील नागरिकांनी प्रशासनावर टीका केली होती. अखेर या टीकेनंतर महापालिकेच्या कामाला वेग आला होता. मंगळवारी या स्मशानभूमीत चिमणी उभारण्यात आलेली आहे. लवकरच ही चिमणी कार्यान्वित होऊन येथील नागरिकांना धुरातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.