एक हजार खाटांची व्यवस्था

ठाणे : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कारकीर्दीत खासगी, स्वयंसेवी संस्थांना दीर्घकालीन भाडेपट्टय़ावर देण्यात आलेल्या सुसज्ज इमारतींमध्ये करोनाबाधितांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे स्वमालकीच्या इमारती भाडेपट्टय़ावर देण्याच्या आंदण धोरणाला तूर्तास चाप बसल्याची चर्चा आता रंगली आहे. साकेत-बाळकुम रस्त्यावरील रुस्तमजी गृहसंकुलात विकासकाकडून बांधून मिळालेली एक लाख २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली वास्तू यासाठी वापरण्यात येणार आहे. याशिवाय माजीवडा भागातील अशीच एक सात मजली इमारतही रुग्णालयासाठी वापरात आणली जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामधील करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४१२ झाला असून त्याचबरोबर शहरात करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. त्या वेळेस महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांसह विविध अधिकारी उपस्थित होते. केंद्र  शासनाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली होती. तसेच या पथकाने रुग्णसंख्या वाढीबाबात अंदाजही व्यक्त केला होता. त्याची दखल घेऊन उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.  करोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रूपांतर तात्पुरत्या स्वरूपात एक हजार खाटांच्या रुग्णालयात करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून तीन आठवडय़ांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले आहेत. या ठिकाणी ५०० खाटा ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० खाटा विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स-रे या सुविधा असतील.