अग्निशमन दलाचा दूरध्वनी लागत नसल्याचे आगीची वर्दी देण्यासाठी रहिवाशांची केंद्राकडे धाव

संकटकाळी १०० क्रमांक फिरवून पोलिसांना पाचारण केले जाते तर १०१ क्रमांक फिरवून अग्निशमन दलाकडे मदत मागितली जाते. परंतु वसई-विरार शहरात १०१ हा क्रमांक कार्यरत नसल्याची धक्कादायक बाब एव्हरशाईन सिटीत लागलेल्या आगीनंतर समोर आली आहे. सावियो इमारतीत लागलेल्या आगीनंतर रहिवाशी १०१ क्रमांकावर संपर्क करत होते. तब्बल १५ मिनिटे रहिवसी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु या क्रमांकावर कुणीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी एक रहिवासी मोटारसायकलवरून अग्निशमन दलाच्या केंद्राकडे गेला आणि अग्निशमन जवानांना घेऊन आला.

वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील सावियो इमारीच्या ‘ए’ विंगमधील २०३ क्रमांकाच्या घराला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीमुळे तिसऱ्याया मजल्यावर ज्वाळा आणि धुरांचे लोट पसरले. पहाटे पाचच्या सुमारास आग लागली, तेव्हा सर्व रहिवासी झोपलेले होते. धुरामुळे लोकांना जाग आली आणि ते खाली धावत आले. लोकांनी मदतीसाठी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क करण्यास सुरुवात केली. परंतु कुणीच प्रतिसाद देत नव्हते. तब्बल १५ मिनिटे आम्ही या क्रमांकावर प्रयत्न करत होतो, पण कुणीच तो क्रमांक उचलला नाही, असे सावियो इमारतीचे सचिव प्रवीण मांजरेकर यांनी सांगितले. शेवटी इमरातीचे एक सदस्य उदय शेट्टी यांनी मोटारसायकल काढली आणि आचोळे येथील अग्निशमन दलाला जाऊन माहिती दिली. तेव्हा अग्निशमन दलाच्या तीन गाडय़ा घटनास्थळी आल्या आणि आग विझवली गेली. वसई विरार शहरात १०१ हा अग्निशमन क्रमांक नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

९ जणांची सुखरूप सुटका

सावियो इमारतीत दोन विंग आहेत. आगीमुळे धूर पसरताच रहिवाशांची धावपळ सुरू झाली. पहाटे पाचची वेळ असल्याने सगळे साखरझोपेत होते. सावियो इमारतीच्या शेजारील इमारतीच्या रहिवशांनी आगीचे लोट पाहिले आणि त्यांनी आवाज दिला. त्यामुळे सावियो इमारतीममधील रहिवाशी कपडय़ानिशी बाहेर आले. पण काहीजण आत अडकून पडले. काही जणांना दार बंद झाल्यामुळे निघता आले नव्हते. अग्निशमन दलाच्या जवानांनी नऊ  जणांना दार तोडून बाहेर काढले, अशी माहिती अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव यांनी दिली.

एव्हरशाईन सिटी येथील सावियो इमारतील लागलेल्या आगीत एका घरातील फर्निचर भस्मसात झाले.

११ वर्षीय मुलाने अनेकांचे प्राण वाचवले

या इमारतीतील प्रवीण मिस्त्री यांच्या घरात आग लागली तेव्हा त्यांची पत्नी सुवर्णा तसेच ११ वर्षांंचा माहीर आणि अजिंक्य (६) हे दोन्ही घरात होते. आगीचे धूर येताच सुवर्णा मुलांना घेऊन बाहेर पडली. त्यावेळी ११ वर्षांंच्या माहीरने प्रत्येक घराच्या दारावरची बेल वाजवून लोकांना सावध केले. आम्ही झोपेत होतो, दारावरची बेल वाजल्याने आम्हाला जाग आली. माहीर प्रत्येकाच्या दाराची बेल वाजवत होता, तेव्हा आम्हाला समजले आणि आम्ही बाहेर पडलो, असे इमारतीचे सचिव प्रवीण मांजरेकर यांनी सांगितले. माहीरने दाखविलेल्या धाडस आणि प्रसंगावधानाचे रहिवाशांनी कौतुक केले.

आमच्याकडे १०१ क्रमांक नाही. परंतु सर्व अग्निशमन दलाचे क्रमांक आम्ही वेळोवेळी जनतेला देत असतो. हे क्रमांक त्यांनी आपापल्या रहिवासी संकुलाच्या नोटीस बोर्डावर लावायचे असतात. सहा अग्निशमन प्रमुखांचे खासगी मोबाइल क्रमांकही आम्ही सर्वत्र लावलेले आहेत.

– दिलीप पालव, अग्निशमन विभाग प्रमुख, वसई-विरार महापालिका.

लोकांनी अग्निशमन दलाचे क्रमांक बाळगायला हवे. आपत्कालीन केंद्रात हे क्रमांक आहेत.  हे सर्व क्रमांक २४ तास सुरू असतात. नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये किंवा जवळच्या डायरीत ते नमूद करून ठेवायला हवेत. माहिती उशीरा मिळाली तरी आम्ही वेळीच आग नियंत्रणात आणली.     सतीश लोखंडे, आयुक्त