करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलेल्या ब्रिटनमधून गेल्या महिनाभरात ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये २३५ प्रवासी आल्याची बाब समोर आली आहे. यापैकी एकाच व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या रुग्णाचे जनुकीय नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर २३५ पैकी १२ जणांचा शोध लागलेला नाही. आरोग्य विभागाकडून त्यांची शोधाशोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या महिनाभरात ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची करोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्य शासनाने अशा प्रवाशांची यादी महापालिका आणि नगरपालिकांना पाठविली आहे. या यादीनुसार महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरात ब्रिटनवरून २३५ प्रवासी आले असल्याची बाब समोर आली आहे. यापैकी २२३ जणांचा शोध लागला असून त्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात केवळ एक जण बाधित आढळून आला. या प्रवाशाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. असे असले तरी १२ प्रवाशांचा शोध लागलेला नाही.

राज्य शासनाकडून आलेल्या यादीतील पत्त्यावर ते सापडलेले नाहीत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या १२ जणांचाही लवकरच शोध लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरात काही जण भाडय़ाने सदनिका घेऊन वास्तव्य करतात. या सदनिकाचा पत्ता ते सर्वच ठिकाणी वापरतात. मात्र सदनिका बदलल्यानंतरही ते पत्ता बदलत नाहीत. अशाच प्रकारे १२ प्रवाशांनी सदनिका बदलल्यामुळे त्यांचा शोध लागत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.