कुपोषण, शारीरिक आरोग्य या पिचलेल्या परिस्थितीमधून दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी कुटुंबांना बाहेर काढायचे असेल तर, प्रथम या घरातील प्रत्येक महिलेच्या हाताला काम दिले पाहिजे असा दूरगामी विचार करून वाडा येथील ‘आसमंत’ स्वयंसेवी संस्थेने जव्हार, वाडा, बोईसर भागांतील आदिवासी महिलांकडून इमिटेशन ज्वेलरी (नकली दागिने) तयार करण्याचे काम सुरू केले. घरकाम, शेती, रोजगाराची अन्य कामे करून आदिवासी महिला घरबसल्या, ‘आसमंत’च्या कार्यालयात येऊन नकली दागिने तयार करण्याचे काम करीत आहेत. सुरुवातीला २० ते २५ महिलांची असलेली ही संख्या आता १२०० वर गेली आहे. या माध्यमातून आदिवासी महिलांना रोजगार आणि त्या माध्यमातून मजुरीचा चांगला परतावा मिळू लागल्याने जव्हार तालुक्यातील २८ गावे नकली दागिने तयार करणारे व्यापारी केंद्र झाली आहेत.

‘आसमंत’ संस्थेच्या संचालिका निशा सवरा यांच्या प्रयत्नांतून आदिवासी महिलांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येत आहे. आदिवासी महिला, पुरुष यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी (पेसा कायदा) वाडय़ा, पाडय़ांवर संस्थेने कार्यक्रम घेतले. या माध्यमातून आदिवासी जागृत होईल; पण त्याला रोजगाराचे साधन नसल्याने तो त्या भागातच खितपत पडेल. हा विचार करून निशा सवरा यांनी आदिवासी महिलांना त्यांची नियमित कामे करून दोन पैसे घरात बसून कमाविता येतील, असा घरगुती उद्योग सुरू करून देण्याचा निर्णय घेतला. ‘जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी स्किल कौन्सिल ऑफ इंडिया’ (जिजीस्का), ‘इमिटेशन ज्वेलरी ऑफ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे (इजमा) मधुभाई पारेख यांच्याशी संपर्क साधला. ‘जिजीस्का’ने आदिवासी महिलांना दागिने तयार करण्याचे प्रशिक्षण द्यायचे आणि ‘इजमा’ने महिलांना काम द्यायचे, या करारावर या दोन्ही संस्थांचे जव्हार तालुक्यातील कोगदा गावात दागिने तयार करण्याची कामे सुरू झाली. सुरुवातीला महिलांना तार, धागा, लोखंडी, कथलाचे मणी देऊन त्यांच्याकडून त्यांच्या बुद्धीकौशल्याला सुचतील असे मंगळसूत्र, गंठण, एकसर, झुबके, कर्णफुले, कुडी, बिंदी, पैंजण, दागिने तयार करून घेण्यात आले. वारली कलेचे ज्ञान असल्याने दागिने तयार करताना तो साज, आकार महिला दागिने तयार करताना देत होत्या. कोणताही साचा समोर न ठेवता आपल्या कौशल्याने तयार केलेल्या या नकली दागिन्यांचे मधुभाई पारेख यांनी कौतुक केले. या महिलांना त्यांच्या कामाचा पुरेपूर मोबदला वेळेवर देण्याची तजवीज केली. कोगदा गावात १२५ महिला घरकाम करून दागिने व्यवसायात गढून गेल्या आहेत.