अग्निसुरक्षा परवाना नसल्याने पालिकेची कारवाई

खास प्रतिनिधी, ठाणे</p>

ठाण्यात अग्निसुरक्षा परवानाविना सुरू असलेली रुग्णालये आणि नर्सिग होमवर महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमध्ये गेल्या दोन दिवसांत १५ रुग्णालयांना टाळे ठोकण्यात आले आहे.

अग्निसुरक्षा परवाना नसतानाही व्यवसाय करणाऱ्या रुग्णालये आणि नर्सिग होमवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, त्यानंतरही अशा रुग्णालयांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली होती. अशा रुग्णालयांची यादी नसल्यामुळे कारवाईस उशीर होत असल्याचा दावा पालिकेने केला होता.

दरम्यान, शहरातील अशा रुग्णालयांची यादी आरोग्य विभागाने तयार करून अग्निशमन विभागाला दिली होती; परंतु या कारवाईमध्ये कोणताही कायदेशीर अडथळा येऊ नये म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये आरोग्य विभाग, शहर विकास विभाग, अग्निशमन दल आणि अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने अग्निसुरक्षा परवाना नसलेल्या रुग्णालयांची तपासणी सुरू केली असून पहिल्या टप्प्यात १५ रुग्णालयांची तपासणी करून त्यांना पाच दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर संबंधित रुग्णालये रिकामी करून त्यांना टाळे ठोकण्यात आले असून येथील रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.

१०५ रुग्णालयांवर  कारवाई होणार

वागळे इस्टेट भागातील ५, नौपाडय़ातील ३, मुंब्य्रातील ४ आणि बाळकुम भागातील ३ अशा १५ रुग्णालयांवर गेल्या दोन दिवसांत कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित रुग्णालयांची समितीकडून तपासणी सुरू आहे. १०५ रुग्णालयांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार आहे, असे  शशिकांत काळे यांनी सांगितले.