शहरातील दीड हजार इमारतींना दुरुस्तीच्या नोटिसा

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अधिक जटिल होत चालला असून पालिकेने शहरातील २१ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. शहरातील जुन्या इमारतींची पडझड होत असल्याने पालिकेने शहरातील दीड हजार इमारतींना दुरुस्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. धोकादायक जाहीर केलेल्या इमारतींमध्ये अद्यापही रहिवासी राहात असल्याने धोका वाढला आहे.

झपाटय़ाने विकसित झालेले आणि प्रचंड गर्दीचे शहर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनू लागला आहे. पालिकेने यंदा २१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. पालिकेने काही इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित करून इमारत जमिनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आजही वेगेवगळ्या कारणामुळे अनेक इमारतींत रहिवासी राहात आहेत, यामुळे दुर्घटना घडली तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

धोकादायक इमारतींची संख्या कमी असली तर दुसरीकडे शहरातील जुन्या इमारतींची पडझड सुरू झाली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला शहरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३० वर्षांहून अधिक काळ झालेल्या इमारतींना रचनात्मक तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील दीड हजारांहून अधिक इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत. इमारतींची दुरुस्ती करावी, संरचनात्मक तपासणी करून घ्यावी, असे पालिकेने या नोटिसांमध्ये म्हटले आहे.

वाढीव चटई क्षेत्रफळाचा प्रश्न प्रलंबित

शहरातील धोकादायक घोषित झालेल्या १७० इमारती आतापर्यंत महानगरपालिकेकडून तोडण्यात आल्या आहेत. पालिकेने जुन्या इमारतींना नोटिसा पाठवल्या असल्या तरी त्यांच्या पुनर्बाधणी रखडली आहे. वाढीव चटई क्षेत्रफळाचा प्रश्न न सुटल्याने पुनर्विकास रखडला आहे. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात मीरा-भाईंदर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होतो. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले जाते. मात्र अधिवेशन संपले की पुन्हा या प्रश्नाला दुर्लक्षित केले जाते. सरकारच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांचे जीव आजवर टांगणीला लागून राहिले आहेत.