ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ काहीकेल्या कमी व्हायचं नाव घेताना दिसत नाहीये. बुधवारी २५ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा ६१८ वर पोहचला आहे. आतापर्यंत १३ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.

बुधवारी नव्याने आढळलेल्या २५ रुग्णांपैकी १४ रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. उर्वरित रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. शहरातील २८९ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु असून ३१६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. अद्याप ३७ रुग्णांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

बदलापूर शेजारी असलेल्या अंबरनाख शहरातही करोनाचा चांगला प्रादूर्भाव जाणवतो आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने ३० जूनपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केलं असून…या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवरही बदलापूर स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे. लॉकडाउन नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिक मास्क न लावता रस्त्यावर पडत आहे. यावर आळा बसवण्यासाठी नगरपरिषदेने दक्षता पथक तयार केलं असून नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल असंही पालिकेने जाहीर केलं आहे.