ठाण्यातील तीन हातनाका भागातील एका जिममध्ये व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाला. प्रतीक परदेशी (वय २८)  असे या तरुणाचे नाव असून याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तीन हातनाका परिसरात ख्यातनाम जिममध्ये प्रतीक परदेशी हा व्यायामासाठी जायचा.  प्रतीक हा खारकर आळी भागात राहत होता. प्रतीक हा जिमचा जुना सदस्य असला तरी तो नियमितपणे व्यायामाला येत नव्हता.

शुक्रवारी जिममध्ये व्यायाम केल्यानंतर प्रतीक पाणी पिण्यासाठी गेला. पाणी प्यायल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती खालावत असल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी प्रतीकला मृत घोषित केले. प्रतीकचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जिममध्ये अतिव्यायाम केल्याने रक्तपुरवठ्यावर परिणाम झाला असावा आणि यामुळे त्याला ह्रदयविकाराचा झटका आला असावा, असे अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. तर व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी वॉर्म अप करणे गरजेचे आहे, असे जिम इन्स्ट्रक्टरने सांगितले.