पालघर जिल्ह्यात १६० अर्भक, १८९ बालकांचा मृत्यू

पालघर जिल्ह्य़ातील बालमृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा शासनातर्फे करण्यात आला असला तरी गेल्या सहा महिन्यांत १६० अर्भकांचा तर १८९ बालकांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. अर्भकांच्या मृत्यूदराचे प्रमाण १२ टक्के तर बालमृत्यूचे प्रमाण १४ टक्के आहे. गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी या योजनांचा लाभ त्यांना प्रत्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे.

पालघर जिल्ह्यत २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर) १३ हजार ७६१ महिलांची प्रसूती झाली. यापैकी ० ते १ वर्ष वयोगटातील १६० बालकांचा तर १ ते ६ वर्षे वयोगटातील १८९ बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सर्वाधिक अर्भकमृत्यू व बालमृत्यू जव्हार तालुक्यात झाले आहेत. जव्हारमध्ये ६५ अर्भकांचा तर ६८ बालकांचा पोषण आहाराअभावी मृत्यू झाला आहे. अतिदुर्गम असलेल्या मोखाडा तालुक्यात या सहा महिन्यांत १३ अर्भकमृत्यू तर १६ बालमृत्यू झाले आहेत. डहाणू आणि पालघर तालुक्यातही बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. वसई तालुक्यात कुपोषणाने मृत्यू झालेल्याचे प्रमाण कमी आहे.

जिल्ह्यातील गर्भवती आणि सहा महिन्यांपर्यंतच्या स्तनदा मातांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दररोज चपाती, भाजी, डाळ, भात, लाडू, अंडी, केळी असा सकस आहार पुरवला जातो. याकरिता प्रत्येक लाभार्थी मागे ३५ रुपयांचा निधी दिला जातो. याखेरीज १ ते ६ वयोगटातील बालकांसाठी चार व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक असे आठवडय़ातील पाच दिवस अंडी देण्यात येतात. पालघर जिल्ह्यात सध्या सुमारे एक लाख बालकांना अंडी, टीएचआर व इतर सकस आहार दिला जात असून या बालकांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार दिले जाते आहेत. आरोग्य तपासणीदरम्यान मध्यम तसेच तीव्र कुपोषित मुलांना बाल ग्रामविकास केंद्रामध्ये भरती केले जाऊन माता-बालकांवर मोफत औषधोपचार व आहार दिला जातो. शासनाकडून मोठय़ा प्रमाणामध्ये खर्च केला जात असताना विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे बालमृत्यू आणि अर्भकमृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

आरोग्यमंत्री म्हणतात, मृत्यू कुपोषणाने नाही

मोखाडासह पालघर जिल्ह्यात झालेले अर्भक मृत्यू आणि बालमृत्यू हे कुपोषणामुळे झाले नसल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. पालघर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असलेल्या डॉ. सावंत यांनी जव्हार-मोखाडा भागाचा पाहणी दौरा केला. अंगणवाडी सेविका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची याविषयी चर्चा केली. गेल्या सहा ते आठ महिन्यांत झालेले मृत्यू विविध आजारांमुळे झाल्याचे सांगून त्यांनी याविषयी अधिक तपास करणार असल्याचे सांगितले.