मागील पाच दिवसात ५० सापांना जीवदान
वसई : पावसाळ्याला सुरुवात होताच वसई-विरार शहरात सापांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील विविध ठिकाणी मागील पाच दिवसापासून तब्बल ५० साप आढळून आले आहेत. या सापांना पालिकेच्या अग्निशमन विभागाने पकडून जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले आहे.
वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार सुरू असून विविध ठिकाणच्या भागात पाणी साचल्याने साप निघण्याचे प्रकार वाढले आहेत. आधीच करोनाचे संकटामुळे नागरिक चिंतेत आहेत त्यात आता साप निघण्याच्या प्रकारातही वाढ झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
वसई शहरातील बहुतेक परिसराला लागूनच नाले व जंगल परिसर गेल्याने हे साप थेट नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. दाटीवाटीच्या एखाद्या ठिकाणी साप गेल्यास त्यावर लक्ष ठेवणेसुद्धा कठीण जाऊ लागले आहे. तसेच जंगल पट्टय़ात अतिक्रमण करून अनेका विकासकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. त्यामुळे साप हे थेट नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत.
साप नागरी वस्तीत येत असल्याने मोठय़ा प्रमाणात त्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत असतात. नुकताच नालासोपारा पूर्वेतील लिंक रोड परिसरात गगन अपार्टमेंट सोसायटीच्या आवारात ९ फूट लांबीचा धामण प्रजातीचा साप घुसल्याची घटना घडली होती. सापाला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले आहे.
मागील पाच दिवसात जवळपास ५० साप पकडले आहेत. त्यामध्ये नाग, धामण, फु रसे, अजगर, मणेर, घोणस अशा विविध प्रजातीचे साप पकडण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. नागरी वस्तीमध्ये घुसणाऱ्या सापांना पकडण्यासाठी चिमटय़ाचा वापर केला जातो व पकडून आणलेले हे साप पुन्हा नागरी वस्तीमध्ये घुसू नये यासाठी त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडून दिले जात आहेत.
मागील काही दिवसांपासून सापांचे रेस्क्यू अधिक वाढले आहेत. या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. जेणेकरून परत ते नागरी वस्तीमध्ये घुसू नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.
-दिलीप पालव, अग्निशमन दल प्रमुख
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:35 am