ठाण्यात सत्ताधारी-आयुक्तांकडून रस्तेकामांची खिरापत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने आयुक्त संजीव जयस्वाल यांना हाताशी धरत दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा बार उडवून देण्याचा बेत आखला आहे. यात रस्ते बंधणीवर ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सहा महिन्यांपूर्वीच रस्तेबांधणीसाठी  ३०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या निविदा काढण्यात आल्या असताना पुन्हा एकदा रस्त्यांवर एवढा खर्च करण्यात येणार असल्याने आगामी निवडणुकांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

येत्या शनिवारच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शहरातील डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जोड रस्त्यांची आणि विकास आराखडय़ातील प्रस्तावित रस्त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. ३६ चौकांचे यूटीडब्ल्यूटी आणि मास्टिक पद्घतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय, स्मशानभूमी, दवाखाने, अभ्यासिका, जल-मलवाहिन्यांसाठी २३० कोटी रुपयांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार केले आहेत. ही कामे शहराच्या विकासासाठी आवश्यक असल्याचा दावा सत्ताधारी आणि जयस्वाल यांचे प्रशासन करत असले तरी त्यासाठी ठरविण्यात आलेला मुहूर्त महत्त्वाचा मानला जात आहे.

ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी काही महिन्यांपूर्वीच ३०० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला होता. पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यावरही महापालिकेला पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आयुक्त जयस्वाल यांनी यापुढे काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार शहरातील डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच यूटीडब्ल्यूटी पद्धती दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. विकास आराखडय़ातील प्रस्तावित रस्ते, जोड रस्त्यांची बांधणी करण्याचे प्रस्तावही तयार केले आहेत.

शहरातील २७२ रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे येत्या तीन वर्षांत करण्याची योजना महापालिकेने आखली आहेत. या कामांवर तीन वर्षांत २७२३९.०८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यापैकी ६९८.२७ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव प्रशासनाने तयार केले असून हे प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवले आहेत.

३६ चौकांचे नूतनीकरण

२५ चौकांचे यूटीडब्ल्यूटी तर १२ चौकांचे मास्टिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी स्वामी विवेकानंद चौक, टेंभी नाका, चिंतामणी, कोर्ट नाका, जेल तलाव, नरवीर तानाजी, गडकरी, आंबेडकर चौक, कोरस नाका, ब्रह्मांड आझादनगर, मानपाडा जंक्शन, पातलीपाडा, सरस्वती शाळा, यशोधननगर, क्रांतिवीर चौक, झेड- २१ वाय चौक, मुंब्रा पोलीस स्थानक चौक, संजय नगर, शंकर मंदिर, किस्मत कॉलनी, कौसा कब्रस्तान चौक, ऐकार्ड कॉम्प्लेक्स, हिलान बेकरी, पाकीजा बेकरी आणि सनशाईन नगर चौक या ठिकाणी यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. तर कॅडबरी सिग्नल, तीनहात नाका, रघुनाथ नगर (तीनहात नाका), नितिन कंपनी, माजिवडा, माजिवडा (आर्ट गॅलरी), माजिवडा (लोढा), साकेत, गोयंका चौक, गोखले रोड आणि आर मॉल या ठिकाणी मास्टिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू

पालिकेच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली नव्हती. कामांसाठी निधी नसल्यामुळे नगरसेवकांत नाराजी होती. सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटले होते. अखेर प्रशासनाने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून जवळपास सर्वच प्रभागांतील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देत नगरसेवकांना खूश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.