नाशिक जिल्ह्य़ातून होणारी आवक मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने कांद्याचे किरकोळ दर शंभरीच्या दिशेने झेपावू लागले असून, सोमवारी ठाणे आणि कल्याणच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे ८० रुपयांनी विकला जाऊ लागला आहे. घाऊक बाजारातून होणारी आवक घटल्यामुळे दर वाढले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर ६० रुपयांपर्यत पोहचले. त्यामुळे किरकोळ बाजारात दरांनी उसळी घेतली आहे.  सोमवारी वाशी येथील घाऊक बाजारात कांद्याची तुलनेने चांगली आवक झाली. त्यामुळे घाऊक दरांमध्ये शनिवारच्या तुलनेत तीन रुपयांनी घट झाली. किरकोळ बाजारात मात्र तेजी कायम आहे. नौपाडा, पाचपाखाडी येथे कांद्याचे दर ८० रुपयांच्या घरात असून वागळे परिसरात मात्र कमी दर्जाचा कांदा स्वस्त दरात विकला जात आहे.