बदलापूरच्या माणकिवली परिसरातील ओंकार केमिकल या कंपनीत मोठा स्फोट झालेला आहे. दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून या स्फोटानंतर परिसरात गुलाबी रंगाचा वायू हवेत पसरला होता. कंपनीत काम सुरु असताना एका भागात झालेल्या छोट्याश्या स्फोटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि नजिकच्या परिसरातील अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी रवाना झाली.

अग्निशमन दलाचे कर्माचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आजुबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला. केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे हवेत गुलाबी रंगाचा वायू पसरल्यामुळे नागरी वसाहतींमध्येही भीतीचं वातावरण पसरलं होतं. आग विझवत असताना अनेकदा आग भडकत असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेरीस आत अडकलेल्या ९ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.

  • पाहा या घटनेचा व्हिडीओ

या आगीत कंपनीचे ९ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती बदलापूर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जखमी कर्मचाऱ्यांवर बदलापुरातील खासगी रुग्णालयात तर काही कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नवी मुंबई-ठाणे आणि मुंबईला पाठवण्यात आलं आहे.