tvlogडोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या ‘फ्रेंडशिप सोसायटी’च्या स्थापनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असूनही गजबजाटासून दूर असलेल्या या वसाहतीत ६९ कुटुंबे राहतात. सोसायटीच्या स्थापनेपासून त्याच्या आवारातील प्रत्येक सुविधेसाठी एकत्र येऊन प्रयत्न करणारे हे रहिवासी जणू एका कुटुंबाचाच भाग आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणारे येथील रहिवासी एकमेकांशी इतके घट्ट बांधले गेले आहेत की, वसाहतीचा पुनर्विकास करून टॉवर उभारण्याचे आमिष दाखवणाऱ्या विकासकांना दारातूनच बाहेर पाठवले जाते.

फ्रेन्डशिप सोसायटी, डोंबिवली पश्चिम

डोंबिवली रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला हाकेच्या अंतरावर परिजात, बकुळ, सरोज, पंकज, शिरीष असा इमारतींचा समूह आहे. फ्रेन्डशिप सोसायटी म्हणून ही वसाहत ओळखली जाते. स्थानकाजवळ असूनही रेल्वे स्थानक परिसरातील गजबजाट, वर्दळीपासून दूर असणाऱ्या या वसाहतीत आता डोंबिवलीत इतरत्र अभावानेच आढळणारी शांतता आहे. श्रेष्ठ मराठी साहित्यिक पु. भा. भावे राहत असलेल्या वाटवेवाडीच्या समोर आणि भावे सभागृहाला खेटून १९६२ पासून दिमाखात उभी असलेली ही वसाहत स्थापनेची ५० वर्ष पूर्ण करीत आहेत. सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत झालेली डोंबिवलीतील फ्रेन्डशिप ही पहिली सोसायटी. १९६५ मध्ये ही सोसायटी नोंदणीकृत झाली आहे. ६९ कुटुंबं या वसाहतीत राहत आहेत.
डोंबिवली गावात पूर्वी ग्रामपंचायत, नंतर नगरपरिषदेचा कारभार होता. आगरी समाजाचे या गावात प्राबल्य होते. पुढे नोकरी, व्यवसायानिमित्त कोकणासह राज्याच्या विविध भागांतील लोक डोंबिवलीत राहण्यासाठी आले. गावाकडून आलेली ही मंडळी चाळी खोल्यांचा आसरा घेऊन वास्तव्य करीत होती. अशाच मंडळींपैकी काही प्रवर्तकांनी एकत्र येऊन १९६२ मध्ये फ्रेन्डशिप सोसायटीची जमीन गंगुबाई नावाच्या जमीन मालकिणीकडून खरेदी केली. कोणताही वाणिज्य, व्यावसायिक दृष्टीकोन मनात न ठेवता प्रवर्तकांनी वास्तुविशारदाकडून या इमारतींचे आराखडे तयार करून घेतले. केवळ राहण्यासाठी ‘सुंदर घर’ या संकल्पनेतून या इमारतींचे, आतील सदनिकांचे रेखाटन करण्यात आले. व्यापार डोळ्यासमोर ठेवून या इमारतींची उभारणी करण्यात आली असती तर या जागेत आताच्या काही वास्तुविशारदांनी, विकासकांनी या ठिकाणी गगनचुंबी निवासी, व्यापारी संकुले उभारून कोटय़वधी रुपयांचा दौलतजादा केला असता. पण, या सगळ्या विषयाकडे पाठ फिरवून ‘घर असावे आपल्यासाठी’ या विचारातून येथील वास्तूंची उभारणी करण्यात आली.
जमिनी खरेदीनंतरच्या तीन वर्षांत म्हणजे १९६४ पर्यंत पाचही इमारतींची बांधकामे पूर्ण झाले. फ्रेन्डशिप सोसायटीच्या आवारात मार्जिन स्पेस, खेळाचे मैदान अशी ऐसपैस जागा इमारतींभोवती सोडून या वास्तू राहण्यासाठी सुसज्ज करण्यात आल्या. गावाकडून येताना आणलेली छोटीशी पुंजी, त्यात मिळणारे तुटपुंजे वेतन, बँकेचे कर्ज अशी जुळवाजुळव करीत साठ ते सत्तर वर्षांपूर्वी आपले प्रांत सोडून डोंबिवलीत आलेल्या गावकऱ्यांनी फ्रेन्डशिप सोसायटीमध्ये पन्नास वर्षांपूर्वी पंधरा ते वीस हजार रुपयांमध्ये सदनिका खरेदी केल्या. या सदनिकांची किंमत आजघडीला कोटीच्या घरात आहे. या इमारतींचा पुनर्विकास करायचा म्हटला तर चार चटई क्षेत्र निर्देशांक येथे मिळू शकतो. इतकी ऐसपैस जागा या सोसायटीत आहे. दस्तुरखुद्द जमीन मालकिणीकडून ही जमीन खरेदी केल्याने या जमिनीवर कोणताही सरकारी, वन, जिल्हाधिकाऱ्यांचा बोजा नाही, असे या सोसायटीचे सदस्य अभिमानाने सांगतात.
पाचही इमारतींमध्ये १९६४-६५ मध्ये रहिवासी राहण्यास आले. आता आपले घर सरकार दप्तरीनोंद झाले पाहिजे म्हणून सदस्यांनी धावपळ सुरू केली. १९६५ मध्ये या पाच इमारतींचा समूह फ्रेन्डशिप सोसायटी या नावाने सरकार दप्तरी नोंदणीकृत करण्यात आला. अशा प्रकारे नोंदणीकृत झालेली फ्रेन्डशिप ही डोंबिवलीतील पहिली सोसायटी. या सोसायटीला कन्व्हेन्स डीडची आवश्यकता नाही. विविध भाग, प्रांतामधून एकत्र आलेले लोक या वसाहतीत राहू लागले. या वसाहतीचा कारभार नेटकेपणाने चालला पाहिजे या उद्देशाने कार्यकारिणी स्थापन झाली. सदस्यांनी सोसायटीचा कारभार पुढील काळात नेटकेपणाने चालला पाहिजे म्हणून सोसायटीचे स्वत:चे उपविधी तयार केले आहेत. सोसायटीच्या आवारातील नेहमीची झाडलोट, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वीज, दरमहाचा देखभाल दुरुस्ती खर्च या बाबत घटनेत काटेकोर नियम केले आहेत. गेल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात वसंत चंदावरकर, व्ही. व्ही. श्रीखंडे आदींनी सक्षमपणे सोसायटीचा कारभार चालवला. अनेक कार्यक्षम पदाधिकारी सोसायटीला लाभले. आता अरुण दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव सदानंद (प्रकाश) देवधर यांची कार्यकारिणी या वसाहतीचा कारभार चालवीत आहे.
१९८५ मध्ये सोसायटीच्या मध्यभागातून नगर परिषदेच्या विकास आराखडय़ाप्रमाणे रस्ता करण्यात आला. त्यामुळे दोन सोसायटय़ा रस्त्याच्या एका बाजूला आणि तीन एका बाजूला गेल्या. मात्र ‘तुम्ही वेगळे आम्ही वेगळे’ असे वातावरण न ठेवता आजही पाच सोसायटय़ांमधील सदस्य खेळीमेळीने राहत आहेत. पालिकेला सार्वजनिक रस्ता, सावरकर स्मारकासाठी सोसायटीने जागा उपलब्ध करून दिली आहे.
सोसायटीच्या आवारातील सांदी कोपऱ्यात नियमित झाडलोट होत असल्याने कुठेही कागदाचा तुकडा पडलेला नसतो. भंगार वस्तू दारासमोर ठेवणे, घरात केलेल्या दुरुस्तीचा मलबा आवारात ढीग मारून ठेवणे, जुन्या सायकली, वाहने कोपऱ्याला लोटणे, गच्चीवर ठेवणे. अशा मंडळींना तात्काळ नोटीस पाठवून त्या काढून घेण्याच्या सूचना केल्या जातात. अन्यथा, परस्पर त्या भंगार विक्रेत्याला विकल्या जाण्याचा नियम सोसायटीत आहे. गच्चीत मुलांनी जाऊ नये म्हणून गच्चीला कायमस्वरूपी कुलूप लावण्यात येते. सोसायटीला रखवालदार नाही. रखवालदारासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वाराला कुलूपबंद दरवाजा बसून घेण्यात आला आहे. चोरांबरोबर कुत्र्यांनाही सोसायटीत प्रवेश करता येऊ नये म्हणून जाळीचे दरवाजे सोसायटीला आहेत. रात्रीच्या वेळेत सोसायटीचे सर्व दरवाजे बंद केले जातात. प्रत्येक सदस्याकडे प्रवेशद्वाराची चावी असते. सोसायटीच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एका प्रवेशद्वारातून वाहने आत आणली जातात. वाहने आत आली की प्रवेशद्वार कुलूपबंद केले जाते. स्वयंचलित पाणी पुरवठा पद्धतीने घराघरांत पाणीपुरवठा केला जातो. सोसायटीत ज्येष्ठ नागरिकांची बहुसंख्या आहे. अनेकांची मुले नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत, तर काही परदेशी आहेत. अशा परिस्थितीत आपण वेगळ्या सदनिकेत राहत असलो तरी एका घरातच राहत आहोत, असा जिव्हाळा येथील सदस्यांनी जपला आहे. एकमेकांना आधार देत सोसायटीचा कारभार चालवला जातो. रात्रीअपरात्री काही अडचण आली तर संपर्कासाठी सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी, दूरध्वनींचे लॅमिनेट केलेले पत्रक ६९ कुटुंबांकडे देण्यात आले आहेत. दर महिन्याला कार्यकारिणीची बैठक होते. सोसायटीतील प्रश्नांची तेथे सोडवणूक केली जाते. सोसायटीच्या आर्थिक ताळेबंदाला दरवर्षी लेखा परीक्षकांकडून ‘अ’ श्रेणी मिळते. सोसायटीच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून जूनच्या पहिल्या आठवडय़ात ६९ कुटुंबीयांना एकत्र येऊन दोन दिवसांचा मनोरंजन सोहळा पार पाडला. अशा घुसमटलेल्या परिस्थितीत शहरात राहूनही आम्ही गावांमधील माणसात जो जिव्हाळा, प्रेम, मोकळेढोकळे वातावरण असते, ते आम्ही फ्रेन्डशिप सोसायटीत अनुभवतोय. आणि ते टिकवण्याचा आमचा सवरेतोपरी प्रयत्न असतो, असे अरुण दोंदे, सदानंद देवधर यांनी सांगितले. महापालिकेने आमच्यासाठी काही करावे, असे आम्ही काही शिल्लक ठेवले नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकाजवळील ऐसपैस फ्रेन्डशिप सोसायटीकडे पाहून अनेक विकासक गगनचुंबी इमारतीची स्वप्ने पाहत जिभल्या चाटत असतात. सोसायटी सदस्य त्यांना थारा देत नाहीत. एकदा वसाहतीत व्यापारीकरण घुसले की तेथे व्यवहार वाढतो आणि माणुसकी संपते. त्यामुळे गगनचुंबी इमारतींच्या मोहात आम्ही फसत नाही, असे येथील रहिवासी आत्मविश्वासाने सांगतात.

आवारात हिरवळीचे मैदान
डोंबिवली म्हटले म्हणजे सीमेंटचे जंगल. पण, फ्रेन्डशिप सोसायटीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर भव्य चौकोनी मैदान आपले स्वागत करते. इमारतीच्या संरक्षक भिंती व सदनिकांच्या अंतरात चोहोबाजूने माती. त्यावर विविध प्रकारची फुलझाडे. मैदानात चोहोबाजूने हिरवळ (दुर्वा). अलीकडे माती म्हटले की इतरत्र ‘कॉर्पोरेट’ सोसायटी सदस्यांचे डोके उठते. कोबा, नाहीतर लाद्या टाकून ती माती नाहीशी करणे आणि उन्हाळ्यात कडक उन्हाचे चटके इमारतीला देणे एवढेच काम सदस्यांकडून सुरू असते. फ्रेन्डशिप सोसायटीच्या सदस्यांनी आवारातील जुनी झाडे, माती आजही टिकवून ठेवली आहे.

आपण रहात असलेल्या वसाहत, सोसायटी, गृहसंकुलात काही वेगळेपण आहे? आपल्या सोसायटीतील उपक्रम, वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम, इतिहास, समस्या, तक्रारी यांची माहिती आम्हाला नक्की कळवा. वैशिष्टय़पूर्ण वसाहतींचा परिचय ‘वसाहतींचे ठाणे’ या सदरातून करून दिला जाईल.
आमचा पत्ता : लोकसत्ता, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला,
गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (पश्चिम) फॅक्स: ०२२-२५४५२९४२
ई-मेल : newsthane@gmail.com