वसई-विरारमध्ये प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद; रेल्वे सुरक्षा बलाचा बंदोबस्त

बहुचर्चित वातानुकूलित लोकल सोमवारी सकाळपासून विरापर्यंत सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांकडून या लोकलचे थंड स्वागत करण्यात आले. तुरळक प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास केला. रेल्वे सुरक्षा बलाचा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. पहिल्याच दिवशी पहिली वातानुकूलित लोकल तीन मिनिटे उशिराने सुटली.

गेल्या आठवडय़ात चर्चगेट-बोरिवलीदरम्यान धावलेली पश्चिम रेल्वेची वातानुकूलित लोकल सेवा सोमवारपासून विरापर्यंत नेण्यात आली. विरार स्थानकात सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी ही ट्रेन दाखल झाली. ती १० वाजून २२ मिनिटांनी फलाट क्रमांक ४ वरून सुटणार होती. मात्र पहिल्याच दिवशी या ट्रेनला तीन मिनिटे उशीर झाला. फार तुरळक प्रवासी या ट्रेनमध्ये चढले होते. विरारमधील गायत्री नागपाल (६२) यांनी विरार ते चर्चगेट असे २०५ रुपयांचे पहिले तिकीट काढले. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी प्रत्येक डब्यात शिरून वातानुकूलित ट्रेनचे तिकीट काढल्याशिवाय प्रवास करू नका, असे आवाहन प्रवाशांना करत होते. या वातानुकूलीत लोकल ट्रेनमुळे नियमित ट्रेनच्या फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दुसरी लोकल दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी सुटली. प्रवाशांची संख्या या ट्रेनलाही तुरळक असली तरी त्यांनी स्वागत केले. प्रवास खूप चांगला झाला पण तिकीटभाडे खूप जास्त आहे. ते परवडणाऱ्या दरात ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आशीष खंडेलवाला या प्रवाशाने दिली. एसी लोकलचा प्रवास खूप सुरक्षित वाटतो. दारे आपोआप बंद झाल्याने धक्काबुकी होणार नाही, असे सांगत राधिका सोनी हिने जास्त भाडे असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विनातिकीट प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी तिकीट तपासनीस स्थानकात दिसत होते. मागील आठवडय़ात तब्बल ४८१ फुकटय़ा प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने १६ हजार १५५ रुपयांचा दंड आकारला होता.

लोकलच्या १२ फेऱ्या

  • वातानुकूलित रेल्वे लोकलचे चर्चगेट ते विरार भाडे २०५ रुपये आहे. आठवडय़ाचा पास १ हजार ७० रुपये, १५ दिवसांचा पास, १ हजार ५५५ रुपये तर मासिक पास हा २ हजार ४० रुपये आहे.
  • या वातानुकूलित लोकलच्या दिवसभरातील १२ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या जलद, ३ अर्धजलद आणि एक फेरी धीमी असेल.
  • शनिवार आणि रविवार या दोन दिवशी देखभालीच्या कामासाठी ही लोकल बंद ठेवली जाणार आहे.
  • चर्चगेटहून विरारमध्ये येण्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
  • या ट्रेनची क्षमता ५ हजार ९६४ प्रवाशांची आहे. त्यात १ हजार २८ प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील.