कामानिमित्त जागोजागी तोडलेल्या सुरक्षा भिंतीमुळे अपघातांना आमंत्रण

भाईंदर : मीरा रोड पूर्व परिसरातील रेल्वे मार्गाला लागून असलेल्या जागेत सुरक्षा भिंत नसल्यामुळे दुर्घटनेची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने यावर लक्ष देऊन तात्काळ भिंत उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मीरा रोड पूर्व परिसरात लोढा मार्ग आहे. या मार्गाला लागूनच पश्चिम रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गात सुरक्षित अंतर ठेवण्याकरिता रेल्वे व पालिका प्रशासनाकडून सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. मात्र या मार्गावरील काही ठिकाणी भिंत ही काही कामानिमित्त तोडल्यामुळे ती पुन्हा उभारलीच नसल्याचे उघडकीला आले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर जाण्याचा मार्ग मोकळा असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावर लहान मुले खेळत असतात. त्यामुळे ती जाण्याची शक्यता अधिक असून गर्दुल्लय़ांचेदेखील वास्तव्य या परिसरात दिसून येते. तसेच रेल्वे मार्गावर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली असताना अशा प्रकारे जागा मोकळी ठेवल्याने दुर्घटनेला आमंत्रण दिल्याचे ठरत आहे. त्यामुळे तात्काळ या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने भिंत उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

या मार्गावर अनेक युवक व्हिडीओ काढण्याकरिता थेट रेल्वे रुळावर जात आहेत. तसेच कोणी मानसिक त्रस्त व्यक्ती आत्महत्या करणार असल्याची भीती अनेक वेळा निर्माण होते.

– सैफ खान, स्थानिक नागरिक

हे काम रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत येते. त्यामुळे याकरिता रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग