बेकायदा बांधकामप्रकरणी आणखी दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

बेकायदा बांधकामास साह्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम वसई-विरार महापालिकेच्या नव्या आयुक्तांनी सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त सुधाकर संख्ये यांना सोमवारी निलंबित केल्यानंतर अन्य दोन सहायक आयुक्तांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. संख्येंवरील कारवाईनंतर काही तासांतच विरार पोलीस ठाण्याचे सहायक आयुक्त नीलम निजाई यांच्यावर बेकायदा बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महापालिकेच्या सहायक आयुक्त स्मिता भोईर यांना निलंबित का करू नये, अशीे कारणे दाखवा नोटीस बजावलीे आहे

वसई-विरार हे शहर झपाटय़ाने विकसित होत असल्याने तिथे अनधिकृत बांधकामांचे प्रमाणही वाढले आहे. सिडको जाऊन महापालिका आली तरी अनधिकृत बांधकामांचे प्रमाण थांबले नाही. भ्रष्ट अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या छुप्या मदतीमुळे शहरात अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. सतीश लोखंडे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याप्रकरणीे गुन्हा दाखल झालेले प्रभारी सहायक आयुक्त सुधाकर संख्ये यांना निलंबित केल्यानंतर दुसऱ्या सहायक आयुक्त स्मिता भोईर यांना निलंबित का करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच विरार पोलीस ठाण्यात सहायक आयुक्त नीलम निजाई यांच्यावरही अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याप्रकरणीे गुन्हा दाखल झाला आहे. या दोनही अधिकाऱ्यांचे निलंबन केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

आजवर कारवाई का नाही?

वसई-विरार शहरात सर्रास अनधिकृत बांधकामे उभी राहत होतीे. त्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग होता. यापूर्वीच्या आयुक्तांनी त्याकडे डोळेझाक केली तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातले. हे अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप विरोधक पूर्वीपासूनच करत आहेत. पण शासनाने सतीश लोखंडे यांच्या रूपाने आयएएस दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून दिल्याने कारवाईची चक्रे वेगाने फिरू लागलीे. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली होतीे. पण अधिकाऱ्यांवर झालेल्या गुन्ह्य़ाचीे दखल घेत त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. आयुक्तांच्या या कारवाईचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. आजवर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, त्यांना कुणी पाठीशीे घातले त्याचीही चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.