डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर भागातील राज वैभव पार्कमागील मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या बेकायदा चाळी व जोत्यांची बेकायदा बांधकामे महापालिकेच्या ‘ह ’ प्रभाग विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. या कारवाईत बांधकाम व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

राजूनगरमधील राज वैभव पार्कच्या मागील बाजूस महापालिकेच्या, सरकारी जागांवर विजय म्हात्रे यांनी आठ बेकायदा खोल्या बांधल्या आहेत. तसेच पंधरा खोल्या बांधण्यासाठी जोते बांधून ठेवले आहेत, अशी माहिती ‘ह’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत व अधीक्षक स्वामी यांना मिळाली होती. कुमावत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना बेकायदा चाळी व नवीन चाळी उभारणीसाठी जोत्यांची बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे लक्षात आले. विजय म्हात्रे हे या बेकायदा चाळी उभारत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.

या भागातून पालिकेचा बाह्य़वळण रस्ता जाणार असून या  कामात अडथळा नको म्हणून प्रभाग अधिकारी कुमावत यांनी ही बेकायदा बांधकामे तोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी राजूनगरमधील सर्व बेकायदा चाळी व नवीन बांधकामासाठी उभारलेल्या जोत्यांची कामे अतिक्रमण विरोधी पथकाने तोडून टाकली. बेकायदा बांधकामांवरची कारवाई सुरूच राहणार आहे.