शलाका सरफरे

दर महिन्यातील एका बुधवारी केवळ तरुणवर्गासाठी कार्यक्रम

नोकरी-व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती पत्करलेल्या काही संवेदनशील मनाच्या ठाणेकरांनी हाती आलेला मोकळा वेळ सत्कार्यी लावण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेला अत्रे कट्टा दोन दशकांच्या वाटचालीनंतर तरुणाईला साद घालत आहे. आरोग्यापासून मनोरंजनापर्यंतच्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या अत्रे कट्टय़ाने आता दर महिन्यातील एक बुधवार तरुणांच्या कार्यक्रमासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यातील भास्कर कॉलनी येथील जिजाऊ उद्यानात १८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अत्रे कट्टय़ाने ठाण्यातील सांस्कृतिकविश्वात महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. या कट्टय़ावरील कार्यक्रमांनी ठाणेकरांच्या मनात विशेष स्थान पटकावले आहे. मात्र या कार्यक्रमांना हजेरी लावणारा प्रेक्षकवर्ग मुख्यत्वे पन्नासपेक्षा अधिक वयोगटातील आहे. त्यामुळे या कट्टय़ाला ज्येष्ठ नागरिक कट्टय़ाचे स्वरूप येऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर आता या कट्टय़ावर महिन्यातील एक दिवस केवळ तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती अत्रे कट्टय़ाच्या संस्थापक सदस्य संपदा वागळे यांनी दिली.

येत्या काळात तरुण पिढीतील नवोदित कवी आदित्य दवणे आणि संकेत म्हात्रे हे दोन तरुण या तरुण कट्टय़ाचे नियोजन पाहणार आहेत. महिन्याच्या शेवटच्या बुधवारी खास तरुणांशी निगडित असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यामध्ये नवोदितांच्या कविता, नृत्य, अभिवाचन, जुगलबंदीसारख्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश होणार आहे. तसेच विविध महाविद्यालयांच्या मराठी वाङ्मय मंडळांचे काही विशेष कार्यक्रम अत्रे कट्टय़ावर आयोजित करण्यात येतील. जेणेकरून तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी माहिती आदित्य दवणे याने दिली.

साहित्य क्षेत्रात धडपडणाऱ्या तरुणांना वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आचार्य अत्रे कट्टा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अत्रे कट्टा आमच्यासारख्या तरुण कलाकारांना आत्मविश्वास देणारे आणि मार्गदर्शन करणारे व्यासपीठ ठरेल.

– आदित्य दवणे, नवोदित कवी

गेली १८ वर्षे ठाण्यातील सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा पुढे नेणाऱ्या अत्रे कट्टय़ाला तरुणांची साथ लाभल्यास कट्टा अधिक फुलेल. तरुण पिढीच्या सहभागाने कट्टय़ावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

– संपदा वागळे, संस्थापिका, आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ