तीन तरुणांना रेल्वे स्थानकांच्या साफसफाईची शिक्षा

किकी चॅलेंजच्या नावाखाली स्टंट करून समाजमाध्यमांवर चित्रफीत प्रसारित करणे तीन तरुणांना महागात पडले. विरार रेल्वे सुरक्षा बलाने या स्टंटबाज तरुणांना बुधवारी ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवस रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली.

धावत्या गाडीतून उतरून नृत्य करण्याचे फॅड सध्या किकी चॅलेंज नावाने आले आहे. गेल्या काही दिवसांपासून यू टय़ूब आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर तीन तरुण विरार स्थानकात धावत्या लोकलबाहेर किकी चॅलेंज नृत्य करत असतानाची चित्रफीत प्रसारित झाली. ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर  विरार रेल्वे सुरक्षा बलाने त्यांच्यावर कारवाई केली. स्टंटबाजी करणाऱ्या निशांत शहा (२०), ध्रुव शहा (२३) आणि श्याम शर्मा (२४) या तीन तरुणांना अटक करण्यात आली. त्यांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत रेल्वे स्थानकात स्वच्छता करण्याचे आणि स्टंटबाजी न करण्याविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले. या कामाची चित्रफीत १३ ऑगस्ट रोजी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत या स्टंटबाजांना हे काम करायचे आहे. त्यानुसार गुरुवारी त्यांनी विरार स्थानकात स्वच्छता केली आणि प्रवाशांशी संवाद साधून स्टंटबाजी न करण्याविषयी आवाहन केले.