विविध साहित्यिक कार्यक्रमांचा समावेश असलेले ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज, शुक्रवारपासून डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवलीत सुरू होत आहे. ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान रंगणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन व्यासपीठावरून या दोन नेत्यांच्या उपस्थितीमुळे साहित्याच्या स्वादाबरोबर रसिकांना राजकीय टिकाटिप्पणीचे चुरचुरीत बोलही ऐकायला मिळतील, अशी चिन्हे आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील कै. ह. भ. पा. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल येथे हे संमेलन रंगेल. शुक्रवारच्या उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, महापौर राजेंद्र देवळेकर, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे, समीक्षक डॉ. म. सु. पाटील सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या या साहित्य जागरात विविध कार्यक्रमांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, समाजसेविका मेधा पाटकर, ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर, प्रभा गणोरकर, रामदास भटकळ, कांचन व कमलाकर सोनटक्के, विश्वास नांगरे पाटील, अशोक नायगावकर, संदीप खरे, डॉ. सलील कुलकर्णी, अ‍ॅड. शांताराम दातार, डॉ. दीपक पवार, प्रा. नीरजा, मीना गोखले, चिन्मय मांडलेकर, अमृता सुभाष, स्पृहा जोशी सहभागी होणार आहेत. साहित्यिक, रसिक वाचक, कवी यांच्या सहभागाबरोबरच डोंबिवली ते अंबरनाथ पर्यंतच्या महाविद्यालयांमधील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. साहित्याच्या प्रवाहात तरुणाईचा सहभाग असावा हा यामागचा उद्देश आहे, असे गुलाब वझे यांनी सांगितले.

संमेलनस्थळी पोहोचण्यासाठी पालिकेने डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे स्थानक परिसरात संमेलन स्थळी जाण्यासाठी माहिती देणारे चौकशी टेबले लावण्यात आली आहेत. कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्या कल्पकतेमधून संमेलन स्थळ सजविण्यात आले आहे. संगीतकार सुखदा भावे-दाबके यांच्या संकल्पनेतून संमेलन गीत तयार करण्यात आले आहे. या गीतात संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे.