साहित्य संमेलन : सेना-भाजपला डावलून आगरी युथ फोरमच्या वझे यांचा दावा

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी आपण स्वत:च स्वागताध्यक्ष असल्याचे जाहीर केले. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर आणि भाजपकडून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे स्वागताध्यक्षपदासाठी चर्चेत असताना वझे यांनी केलेल्या घोषणेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन डोंबिवलीत व्हावे, यासाठी आगरी युथ फोरमच्या वतीने चार वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन यंदाचे ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन डोंबिवलीमध्ये होणार आहे. यामुळे स्वागताध्यक्ष ठरविण्याचा अधिकार आगरी युथ फोरमला असल्याचे वझे यांनी सांगितले. यानुसार फोरमच्या बैठकीत स्वागताध्यक्षपदासाठी गुलाब वझे यांचे नाव जाहीर करण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर या सर्वाची नावे चर्चेत असताना वझे यांनी स्वागताध्यक्षपद स्वतकडे ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार

या सर्व मान्यवरांबद्दल आपणास पूर्ण आदर असून सर्वाच्या सहकार्याने संमेलन यशस्वी पार पाडू, असा निर्धार वझे यांनी या वेळी व्यक्त केला. ९ ऑक्टोबरला संमेलनाविषयीची पहिली सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व संस्थांचे प्रतिनिधी, शहरातील मान्यवर साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांच्या संमेलनाविषयी सूचना यावेळी मांडण्यात येतील, असे वझे यांनी सांगितले. डोंबिवली शहरात येत्या दोन-तीन महिन्यांत विविध कार्यक्रम असल्याने पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या अखेर किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे संमेलन घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.