भाईंदर पूर्व परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात रात्रीच्या सुमारास मद्यपान आणि अमली पदार्थाचे सेवन होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे आढळून आले आहे. याकडे पोलिसांचे आणि पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

भाईंदर पूर्व परिसरातील खेळण्याकरिता असलेल्या मैदानाचा वापर रात्रीच्या सुमारास मद्यपान करण्यासाठी होत असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या सुमारास अनेक तरुण दुचाकी आणि चारचाकी अंधारात उभी करून मद्यसेवन करत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रात्रीच्या सुमारास होणाऱ्या मद्यपार्टीचा त्रास सकाळी खेळण्यास जाणाऱ्या लहान मुलांना सहन करावा लागत आहे. कारण या मद्यपाटर्य़ामुळे मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होते. सर्वत्र बाटल्यांचा खर्च, सडलेले अन्नपदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येतात. काचेच्या बाटल्यांमुळे अनेक बालकांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

या मैदानांवर विजेची सोय नसल्याने मद्यपी, गर्दुल्ले यांचे फावते. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दुल्लेही असल्याने मैदानावर बालकांना सोडण्यास पालक धजावत नाहीत. पोलिसांनी आणि महापालिकेने या मैदानांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

मैदाने ही खेळण्यासाठी असतात. मात्र मैदानांचा वापर मद्यपी व गर्दुल्ले करत असतील तर ते गंभीर आहे. त्याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होण्याची शक्यता आहे. – रोहित पाटील, स्थानिक रहिवासी