ठाणे महापालिका आयुक्तांकडून परिसरातील दुर्दशेची पाहणी
ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभागांतर्गत येणाऱ्या आंबेघोसाळे तलावाची डागडुजी, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी दिले. ठाणे शहरातील अत्यंत जुन्या तलावांपैकी एक असलेल्या या तलावाची पाहणी गुरुवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने केली. शहरातील मासुंदा तसेच इतर तलावांच्या सुशोभीकरणासाठी विविध प्रकल्प राबविले जात असताना उथळसर भागातील हा तलाव दुर्लक्षित राहू नये, अशी मागणी या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, असे आदेश जयस्वाल यांनी महापालिकेचे नगर अभियंता रतन अवसरमोल यांना दिले.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी सकाळी शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरे तसेच या भागातील नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासोबत या तलावाची पाहणी केली. या वेळी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंते त्यांच्यासोबत उपस्थित होते. आंबेघोसाळे तसेच आसपासच्या परिसराची पाहणी केल्यानंतर या भागातील दुर्दशेचे अनेक नमुने त्यांच्यापुढे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडले. शहरातील जुन्या तलावांपैकी एक असलेल्या या तलावास लागूनच मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. तसेच फेरीवाले आणि घाणीमुळे हा संपूर्ण परिसर व्यापला आहे. या बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी या वेळी दिले.
या तलावाची दुरुस्ती, वृक्ष लागवड, विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण आणि तलावाची रंगरंगोटी करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. त्याचप्रमाणे तलावाच्या मध्यभागी संगीत कारंजे तयार करण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. हे काम येत्या महिनाभरात सुरू करण्याच्या सूचना नगर अभियंता रतन अवसरमोल यांना देण्यात आल्या आहेत. मासुंदा तसेच आसपासच्या तलावांच्या सुशोभीकरणासोबत तलावांमधील स्वच्छतेवर भर देण्यासाठी यापूर्वीच काही प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. आंबेघोसाळे तलावाचाही यामध्ये समावेश केला जावा, असे आदेश जयस्वाल यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.