जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन; सरकारी पातळीवर काम सुरू
अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महापालिकेच्या निर्मितीसाठी राजकीय पक्षांनी नाहक व वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध सुरू केला असला तरी शासन पातळीवर एकत्रित महापालिकेच्या प्रस्तावावर काम सुरू झाले आहे. यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची बैठक येत्या ५ जानेवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे.
अंबरनाथ व बदलापूर एकत्रित महापालिकेच्या विरोधासाठी राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शासन ही महापालिका लवकरच अस्तित्वात आणण्यासाठी कटिबद्ध असून वरिष्ठ पातळीवर यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य अधिकारी, कोकण विभागाचे नगररचना सहसंचालक, ठाण्याच्या जिल्हाधिकारी, अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही नगरपालिकांचे मुख्याधिकारी, ठाणे जिल्हा प्रशासन अधिकारी यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
महानगरपालिका क्षेत्रातली लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांचे महसुली उत्पन्न, भौगोलिक सलगता, प्रस्तावित महानगरपालिका हद्दींचे सीमांकन, भविष्यातील कर्मचारीवर्ग आदी मुद्दय़ांचा अभ्यास करून ही समिती तीन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. वरील मुद्दय़ांच्या अनुषंगाने या अभ्यास समितीची येत्या पाच जानेवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पहिलीच बैठक पार पडणार आहे. त्यानंतर येत्या २८ मार्चपर्यंत ही समिती महापालिकेबाबत शासनाला अंतिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.