मुरबाड-शहापूरमधून दररोज तीन ते चार हजार लिटर दुग्धसंकलन

देशातील शेतकऱ्यांना समृद्धीची वाट दाखवणारी अमूल दुग्धक्रांती योजना पालघरपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्य़ातही रुजू लागली आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने सुरूकरण्यात आलेल्या दुग्धव्यवसाय योजनेमुळे मुरबाड, शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि अमूल कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचे दूध विकत घेतले जात आहे. विशेष म्हणजे मुरबाड, शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातून दरदिवशी तीन ते चार हजार लिटर एवढा दुधाचा पुरवठा ठाणे शहरात होत आहे. गावातील शेतकऱ्यांकडून दूधविक्रीबरोबरच शहरात पनीरचा पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरूकरण्यात आला असून पनीरलाही मागणी असल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुरूकरण्यात आलेल्या दुधाळ जनावरांचे गट वाटप योजनेच्या अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक दुधाळ जनावराची किंमत ४० हजार रुपये आहे. त्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ५० टक्के तसेच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात असून शहापूर तालुक्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शहापूरमधील चिखलगाव, वास्कोले, वेळोली, बाभळे, शिवाजीनगर, दर्डेपाडा, गुंडय़ाचा पाडा, उमराई, नायकाचा पाडा येथील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मुरबाड आणि शहापूरमधील गाई किंवा म्हशींच्या उत्कृष्ट दर्जाच्या दुधाला ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. त्यानुसार ठाणे सिटी डेअरीला शेतकरी थेट दुधाचा पुरवठा करत असल्याने शेतकऱ्यांना प्रति लिटर ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे.

त्याचप्रमाणे डोळखांब येथे दोन आणि मढगाव येथे एक अमूल केंद्र उभारण्यात आले असून या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या गाई किंवा म्हशींच्या दुधाच्या स्निग्धतेनुसार भाव मिळतो. अमूल कंपनीच्या संलग्नतेतून दिवसाला ठाणे शहरात तीन ते चार हजार लिटर दुधाचा पुरवठा होत असतो. या माध्यमातून गावातील शेतकरी पनीर तयार करून उत्कृष्ट दर्जाचे पनीर ठाणे शहरातील डेअरी, दुकानात पुरवत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे साहाय्यक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप ढांके यांनी दिली.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण

दुग्धोत्पादन व्यवसाय करताना गाई किंवा म्हशींच्या खांद्यावर खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. मका, यशवंत गवत, धजराज असा हिरवा चारा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे डॉ. दिलीप ढांके यांनी सांगितले.

राज्य शासनाने सांगितलेल्या अटींची पूर्तता करून या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ घेता येत आहे. शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केल्यावर अटींची पूर्तता केली असल्यास शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. जिल्हा परिषद आणि अमूल कंपनीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे.    – डॉ. प्रशांत कांबळे, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद