ठाणे जिल्हय़ातील काही मंदिरांत घातपात घडविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी डोंबिवलीतील प्रसिध्द गणेश मंदिरामध्ये जाऊन तपासणी केली. या मंदिरात बुधवारी सकाळी श्वान आणि बॉम्बशोध पथक दाखल झाल्याने भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, घातपाताच्या शक्यतेमुळे तपासणी करण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले.
ठाणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या शहरांतील प्रसिद्ध मंदिरे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळी डोंबिवली फडके रोड येथील प्रसिद्ध गणेश मंदिराची या पथकाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्वान आणि बॉम्बशोधक पथकासह तपासणी केली. स्वामी नारायण मंदिर, कल्याणमधील बिर्ला मंदिर, उल्हासनगर तसेच अंबरनाथ परिसरातील प्रसिद्ध मंदिरांची माहितीही पथकाकडून घेण्यात आल्याचे समजते. या मंदिर व्यवस्थापनांना सतर्क राहण्याचे आदेश पथकाने दिले आहेत.
दहशतवादविरोधी पथकाचे काही तपास अधिकारी तसेच दोन बीट मार्शल दिवसातून चार वेळा येऊन या ठिकाणी तपासणी करून जात असल्याचे गणेश मंदिर व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यात येत असून अनोळखी व्यक्तींच्या हालचाली टिपण्यास सुरक्षारक्षकास सांगण्यात आले आहे. दरम्यान, घातपाताच्या शक्यतेबाबतची माहिती केवळ दहशतवादविरोधी पथकाकडे असून, मंदिरांना अद्याप काही माहिती किंवा नोटीस आलेली नाही; परंतु पथकाने आम्हाला सर्तक राहण्यास सांगितले असून संपूर्ण मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. गरज म्हणून पडल्यास सुरक्षा वाढविण्याचा विचार करणार आहोत, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने ठोस माहिती देण्यास नकार दिला.