आंध्र प्रदेश येथून मुंबईत दाखल झालेल्या इस्थर अनुह्य़ा (वय २३) या अभियंता तरुणीवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी चंद्रभान सानप (२९) याला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवले. त्याला काय शिक्षा द्यावी यावर सरकारी आणि त्याच्या वकिलांचा बुधवारी युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय शिक्षेचा निर्णय देईल.

विशेष सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश वृशाली जोशी यांनी सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य़ मानत सानपला अपहरण, बलात्कार आणि निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणे आदी आरोपांत दोषी ठरवले. सरकारी पक्षाने ३९ साक्षीदार तपासले.
आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम्ची रहिवासी असलेल्या इस्थरची ‘टीसीएस’ कंपनीच्या गोरेगाव येथील शाखेत साहाय्यक व्यवस्था अभियंता म्हणून निवड झाली होती. ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे ती रेल्वेने मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर आली. तेथून ती मुंबईतील नातेवाईकांकडे जाणे अपेक्षित होते. मात्र ती आली नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आल्यावर तिच्या आई-वडिलांनी मुंबईत धाव घेत इस्थर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी रेल्वे पोलीस ठाणे गाठले. मात्र ती आंध्र प्रदेशातून आल्याने तिथे तक्रार नोंदविण्यास सांगण्यात आले. हद्दीच्या वादामुळेच इस्थरचा शोध घेण्यात आला नाही. १० व्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर मात्र पोलिसांचे धाबे दणाणले. टिळक टर्मिनसवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नेमके काय घडले याचा शोध घेण्यात आला. त्या वेळेस गाडीतून उतरल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीसोबत ती बाहेर पडल्याचे उघड झाले. त्यानंतर झालेल्या पडताळणीत तसेच अडीच हजार संशयितांच्या चौकशीनंतर म्हणजेच हत्येनंतर दोन महिन्यांनी पोलीस सानपपर्यंत पोहोचले.

सीसीटीव्हीने नराधमाचा शोध..
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या पहाटे नेमके काय घडले हे उघड झाले. त्यानुसार इस्थर गाडीतून उतरली. तेव्हा स्थानकात सानप बसला होता. मदतीचा बहाणा करून तो तिला घेऊन गेला. त्याला अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीतून पुढचा घटनाक्रम उघड झाला. सानपने तिला अंधेरी येथील तिच्या नातेवाईकांकडे नेण्याऐवजी ओसाड परिसरात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा दाबून हत्या केली. १६ जानेवारी २०१४ रोजी तिचा मृतदेह भांडुप येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर आढळून आला. सानप सुरुवातीला नाशिक येथे चालक म्हणून नोकरी करीत होता आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.