मद्यपान, विनापरवाना चित्रीकरण, अनधिकृत बांधकामांचा उच्छाद

वसई : वसईच्या किल्ल्यात विविध गैरप्रकार वाढले असून ‘किल्ले वसई मोहीम’ या दुर्गप्रेमींच्या चळवळीकडून किल्ला संवर्धन आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याबाबत करण्यात येत असलेल्या तक्रारींकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करत आहे. वसईच्या किल्ल्यात सध्या विवाहपूर्व छायाचित्रणाच्या नावाखाली प्रेमी युगुलांनी उच्छाद मांडला आहे. याशिवाय मद्यपान, विनापरवाना चित्रीकरण तसेच अनधिकृत बांधकामांचाही या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुकाळ झाला आहे. याबाबत तक्रारी करूनही पुरातत्त्व विभाग कारवाई करत नसल्याची खंत दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

वसईच्या किल्ल्यात अनेक बेकायदा बांधकामे झालेली आहेत. यामध्ये पुरातत्त्व विभागासह इतर शासकीय आस्थापनांनीही याठिकाणी अनधिकृत बांधकामे केली आहेत. मौनी बाबा झोपडी, कस्टम बांधकाम, दर्या दरवाजा, हनुमान मंदिरासमोरील अनधिकृत बांधकामे, भुई दरवाजाजवळील झोपडय़ा इत्यादींबाबत तक्रारी करूनही पुरातत्त्व विभाग कोणतीही कारवाई करत नाही.

याबाबत अनेकदा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या स्थानिक कार्यालयासह शीव येथील मुख्यालयात तक्रारी करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पुरातत्त्व विभाग केवळ नोटिसा काढते. मात्र, गैरप्रकारांना आळा बसेल, अशी कोणतीही ठोस कारवाई करत नाही. किल्ल्यातील सुरक्षारक्षक किल्ल्यात होणाऱ्या गैरप्रकारांपुढे हतबल होत आहेत, अशी खंत दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

वसईच्या किल्ल्यात प्रविष्ट होणाऱ्या कोणत्याही मार्गावर तपासणी केंद्र नाही. त्यामुळे दिवसा कोणत्याही वेळी तसेच रात्री-अपरात्री याठिकाणी कोणीही येतो. त्यामुळे किल्ल्यात विविध गैरप्रकार वाढले आहेत. येथे संत गोन्सालो गार्सिया चर्च तसेच फ्रान्सिस्कन चर्चचा वापर विनापरवानगी मोठय़ा प्रमाणात मॉडेलिंगच्या चित्रीकरणासाठी केला जात आहे.

पुरातत्त्व विभाग बघ्याच्या भूमिकेत

किल्ल्यातील गैरप्रकारांकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी गतवर्षी आम्ही संपूर्ण राज्यातील दुर्गप्रेमींना एकत्र करून दोन दिवस आंदोलन केले होते. त्या वेळी १५ दिवसांत किल्ल्यातील गैरप्रकारांना आळा घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. आजही आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतो, त्यावेळी किल्ल्यातून दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा खर्च आढळून येतो. किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. विविध गैरप्रकाराच्या माध्यमातून किल्ल्याचे विद्रूपीकरण सुरू असतानाही पुरातत्त्व विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप वसईतील इतिहास संशोधक श्रीदत्त राऊत यांनी केला आहे.

किल्ल्यात जी अनधिकृत बांधकामे झालेली आहेत, त्याप्रकरणी नियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय किल्ल्यात कोणी मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाते. कर्मचाऱ्यांचे लक्ष असते.

– कैलास शिंदे, किल्ला संवर्धन अधिकारी, पुरातत्त्व विभाग