पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष; पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची वानवा

वसईतील ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे मानले जाणाऱ्या बौद्ध स्तूपाला दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांची आणि बौद्ध अनुयायांची संख्या वाढत आहे. मात्र या ठिकाणी पाणी आणि स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधादेखील नसल्याने भाविक आणि पर्यटकांचे हाल होत आहेत. हा परिसर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने पालिका सुविधा देण्यास हतबल ठरत आहे.

नालासोपारा पश्चिमेला पूर्वी शूपार्रक बंदर म्हणून ओळखले जायचे. शूपार्रक ही कोकण प्रांताची राजधानी होती आणि येथून आंतरराष्ट्रीय व्यवहार चालत असत. याच सोपारा गावात अडीच हजार वर्षांपासूनचा ऐतिहासिक बौद्ध स्तूप आहे. यामुळे या बौद्ध स्तूपाची नोंद आंतरराष्ट्रीय स्मारकात केली जाते.

या बौद्ध स्तूपाला भेट देण्यासाठी दररोज देशविदेशातील पर्यटक तसेच बौद्ध धम्माचे अनुयायी येत असतात. मात्र येथे आल्यावर त्यांची मोठी गैरसोय होते. पाणी पिण्यासाठी पाणपोई नाही तसेच स्वच्छतागृह नाही. त्यामुळे लोकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. हा परिसर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे पालिकेला काही काम करता येत नाही. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी बौद्ध स्तूपाच्या विकासासाठी एक कोटी रुपये आमदार निधीतून जाहीर केले होते. मात्र तो निधी वापरता येत नाही.

अनेक धार्मिक शिबिरे, विपश्यना या स्तूपात होत असतात. त्या वेळी फिरते शौचालय, पाण्याच्या टाक्या मागवाव्या लागतात. हे आंतरराष्ट्रीय केंद्र असल्याने येथे कायमस्वरूपी प्राथमिक सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.  वसई-विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी याबाबत पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पुरातत्त्व खात्याने या सोयीसुविधा पुरविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय धम्म शिबिरे होत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटतात. त्यामुळे आता आम्ही पुरातत्त्व खात्याला सांगून हे काम पालिकेमार्फत करवून घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

 

पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत हा परिसर असल्याने आम्हाला काही करता येत नाही; परंतु आम्ही स्तूपाच्या बाहेर स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा उभारणार आहोत.

सतीश लोखंडे,  आयुक्त, वसई-विरार महापालिका